बीड (रिपोर्टर): मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोक्का कायदा लावण्यात आला आहे. केवळ वाल्मिक कराड याच्यावरच फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे.
मात्र, वाल्मिक कराडलाही मोक्का लावून त्याच्यावर 302 कलमातंर्गत कारवाई करा, असा आग्रह धरण्यात आला आहे. या मु्द्द्यावरुन विरोधक आणि देशमुख कुटुंबीयांना आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील सातत्याने सहभागी होत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता असल्याने आता बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यात 14 तारखेपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी राहणार आहे.