राणी लक्ष्मीबाई टॉवरवर कराड समर्थकांचे आंदोलन
जातीय द्वेष, राजकीय दबावातून कारवाई न करता नि:पक्ष चौकशी करा अन्यथा आज सामुहिक आत्मदहन करू -कराड समर्थकांचा इशारा
परळी (रिपोर्टर): मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सह आरोपी करा, या मागणीसाठी काल देशमुख कुटुंबियांनी आंदोलन केल्यानंतर आता वाल्मिक कराड यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने आणि जातीय द्वेषातून कारवाई होत असल्याचे सांगत वाल्मिक कराड यांच्या मातोश्री पारुबाई कराड या लेकाच्या न्यायासाठी बाहेर पडल्या असून त्यांनी आज सकाळपासून परळी शहर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी परळीच्या राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात आंदोलन सुरू केले आहे. काही समर्थक थेट राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढल्याचे दिसून येत असून वाल्मिक कराड यांना जाणीपुर्वक अडकवले जात आहे. ते निर्दोष आहेत. त्यांना सोडा नाहीतर आत्मदहन करू, असा इशारा समर्थकांनी दिला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सात जणांविरोधात केज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे तर वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल आहे. वाल्मिक कराड यांच्या विरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांच्यावर मोक्का लावण्यात यावा, अशा आशयाची मागणी काल देशमुख कुटुंबियांनी केली होती, आंदोलनही केले होते. आता वाल्मिक कराड यांच्या बचावासाठी त्यांचे समर्थक आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर लेकाला न्याय मिळवून देण्यासाठी वाल्मिक कराड यांच्या मातोश्री रस्त्यावर उतरल्या आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने आणि जातीय द्वेषातून कारवाई होत असल्याचे मत वाल्मिक कराड यांच्या मातोश्री पारुबाई कराड यांनी व्यक्त केला आहे. जाणीवपुर्वक वाल्मिक यांना अडकवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे परळीकरांनी वाल्मिक कराड यांच्यावरची कारवाई ही जातीयद्वेषातून होत आहे ती थांबवावी नसता सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. आज सकाळपासून परळीच्या राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून काही जणांचं आंदोलन सुरू आहे तर हजारो जण टॉवरखाली बसून निदर्शने करत आहेत. जातीयद्वेष आणि राजकीय दबावापोटी वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई न करता नि:पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी करत देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाने आरोपी अटक केलेले आहेत, सरकारने नियुक्त केलेली तपासणी यंत्रणा योग्य पद्धतीने तपास करीत आहे. आवश्यक असलेले आरोपींना अटक केलेले आहे. प्रत्येक गोष्टीची मिडिया ट्रायल, परळी व बीड जिल्ह्याची बदनामी करून जातीयवाद पसरवणे सध्या सुरू आहे. हे सर्व मिडिया ट्रायल थांबवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
000









