गणेश सावंत
गर्जा महाराष्ट्राचा दर्जा अधिक मजबूत व्हावा म्हणून इ.स. 1960 साली मराठवाडा महाराष्ट्रात विनाअट सामील झाला. तत्कालीन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा मराठवाड्याला झुकते माप दिले जाईल, असा शब्द दिला होता. जोपर्यंत यशवंतराव मुख्यमंत्री होते तोपर्यंत त्यांचे मराठवाड्याकडे लक्ष होते. मात्र जेव्हा अखंड हिंदुस्तानावर चीनने हल्ला केला तेव्हा त्या हिमालयाच्या मदतीला आमचा सह्याद्री धावून गेला आणि यशवंतराव देशाचे संरक्षण मंत्री झाले. त्यानंतर मारुतराव कंन्नमवार यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली, त्यांचेही अकाली निधन झाले आणि वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. वसंतरावांचा पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाला विरोध असताना शंकरराव चव्हाणांनी भगिरथी प्रयत्नांतून जायकवाडीचा प्रकल्प पुर्ण केला. त्यामुळे ते अडीच लाखपेक्षा अधिक क्षेत्र आज ओलिताखाली आहे. त्यानंतर
पुढे मराठवाड्याचे काय?
हा सवाल आणि पन्नास वर्षाचा इतिहास सांगण्यामागचे कारणच एवढे की, आज मराठवाड्याचे काय? या प्रश्ना व्यतिरिक्त उत्तर ते काहीच मिळणार नाही. हो, इथे आमदार, खासदारांची मालमत्ता डोळे दिपवणारी असेल, इथे त्यांच्या दोन-चार बगलबच्च्यांची मालमत्ता ही एखाद्या उद्योग धंदे करणार्या अदानी-अंबानीलाही लाजवेल, इथे लाचखोर अधिकार्यांची मालमत्ता ही कित्येक कोटींच्या घरात असेल, परंतु जेव्हा मराठवाड्याच्या दरडोई उत्पन्नाचा आलेख समोर येतो तेव्हा मराठवाड्यातल्या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाचे दरडोई उत्पन्न पाहितले तर आजच्या लोकप्रतिनिधींना नेते म्हणवून घेणार्यांना लाज कशी वाटत नाही? असेच आहे.

मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न
विधीमंडळात सादर झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत राज्यातील 34 जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील सर्वाधिक जिल्हे हे खालच्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न 2 लाख 78 हजार 681 रुपये एवढे आहे. तर देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न हे 1 लाख 88 हजार 892 रुपये एवढे आहे. राज्यात एकूण 36 जिल्हे असले तरी आर्थिक पाहणी अहवालात मुंबई शहर आणि उपनगर हा एकच जिल्हा ग्रहीत धरण्यात आला आहे. तिकडे ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांचे एकत्रित उत्पन्न यात दाखवण्यात आले आहेत. मराठवाड्यातले जालना, बीड, परभणी, हिंगोली यांचे सरासरी दरडोई उत्पन्न हे सर्वात कमी असल्याचे या अहवालातून दिसून येते. जालना 1 लाख 78 हजार 329, बीड 1 लाख 77 हजार 240, परभणी 1 लाख 75 हजार 758 तर हिंगोली 1 लाख 47 हजार 333 एवढे आहे. यातून मराठवाडा आर्थिकदृष्ट्या किती मागास होत चालल्याचे स्पष्ट होते. सर्वसामान्य माणसाचे दरडोई उत्पन्न वाढवून त्यांची पत वाढवण्यापेक्षा इथे
‘कबरी’ची पत
वाढवण्याचे धंदे सुरू झालेत. गेल्या दोन वर्षांपासून मराठवाडा प्रचंड अस्थिर असल्याचे दिसून येते. कधी आरक्षणाच्या मुद्यावर, कधी जातीच्या मुद्यावर तर कधी धर्माच्या मुद्यावर मराठवाड्यातले काही जिल्हे प्रचंड प्रमाणात आक्रमक झाल्याचे दिसते. प्रामुख्याने बीड, जालना, उस्मानाबाद, संभाजीनगरया जिल्ह्यांना जातीची आणि धर्माची नशा अधिकच चढल्याचे वारंवार घडणार्या घटनाक्रमावरून दिसते. अशा स्थितीमध्ये जातीवादाचे उच्चाटन करण्यासाठी आणि धर्मांध लोकांच्या मुसक्या बांधण्यासाठी शासन-प्रशासन व्यवस्थेने प्रबोधनासह कायद्याचा बडगा दाखवणे नितांत गरजेचं असतं, मात्र इथे विधीमंडळात काम करणारेच जेव्हा धर्म आणि जातीला अनन्यसाधारण महत्व देत इतिहासाच्या पानातून भविष्याचा वेध घेण्यापेक्षा रक्ताळलेल्या इतिहासाच्या खांद्यावर बंदूक ठेवून इथं रक्त-मांसाचा चिखल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथेच सर्वसामान्यांचे दरडोई उत्पन्न आणि त्या माणसाची पत कबरीत गाढली जाते.
पत गाढणारे अन्
निर्माण करणारे कोण?
हा प्रश्न वाचून खरंतर प्रत्येकाला हसू येईल. आम्हीही हे लिहिताना हसतो! कारण पत गाढणारे इथे पत निर्माण करतात आणि ज्यांच्या मनगटात पत निर्माण करण्याची क्षमता आहे ते जातीपातीच्या आणि धर्माच्या नावावर धर्मांध होत स्वत:ची पत गाढून टाकतात. आलय का लक्षात, जेव्हा केव्हा जातीय दंगली भडकतात, धार्मिक दंगली भडकतात तेव्हा कुठल्याच पैश्यावाल्याच्या लेकराला दगड लागलेला दिसत नाही. जे ‘गर्व से कहो’ म्हणतात, त्यांच्या घरातला एकही पोरगं रस्त्यावर हातात दगड घेऊन नसतो. ते ‘बिचारे’ देश-विदेशात शिक्षण घेत असतात, आपलं भविष्य घडवित असतात, आम्ही मात्र ‘जय भवानी, अल्लाहू अकबर’ च्या घोषणा देत रस्त्यावर उतरतोत. आता तरी लक्षात घ्या आपलं लक्ष्य हे आपलं दरडोई उत्पन्न वाढवणारा असावं, आपली पत वाढवणं असावं. धर्म अभिमान, स्वाभिमान हा प्रत्येकाला असतोच, तो असायलाच हवा. स्वत:च्या धर्माबरोबर प्रत्येकाने परधर्माचाही आदर करावा, हेच गीता, कुरआन आणि बायबल जगातले सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ सांगत आले आहेत. एका वक्यात सांगायचे झाल्यास तर गिता कहेती है त्याग करो, कुरआन कहेता है यकीन करो, बायबल कहेता है प्यार करो, जिथे त्याग, विश्वास आणि प्रेम असतो तिथे पत असते.