बीड (रिपोर्टर): शिरूर कासार येथील गुन्हेगार सतीश भोसले याचे अतिक्रमणात असलेले घर वनविभागाने नुकतेच पाडले. घर पाडण्यापुर्वी वनविभागाने भोसले याच्या कुटुंबियाला कोणतीही नोटीस दिली नव्हती. या घरासोबत काही समाजकंटकांनी त्याचे घरातील साहित्यही जाळून टाकले होते आणि भोसले कुटुंबीय उघड्यावर पडले होते. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अनुसुचीत जाती जमातीचे उपाध्यक्ष अॅड. धर्मापाल मेश्राम यांनी भोसले कुटुंबियांसोबत पारधी समाजातील इतर कुटुंबियांची भेट घेतली.

खोक्या ऊर्फ सतीश भोसले याचे काही वादग्रस्त व्हिडिओ गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सोशल माध्यमावर प्रसारीत झाले होते. त्यानंतर पोलिसांनी खोक्या ऊर्फ सतीश भोसले याला अटक केली होती. अटक केल्यानंतर लागलीच दोन दिवसांनी त्याचे शिरूर कासार येथील वनविभागाच्या जागेत असलेले घर पाडण्यात आले होते. घर पाडण्यापूर्वी वनविभागाने या कुटुंबाला कोणतीही लेखी नोटीस दिली नव्हता किंवा तोंडी सूचनाही दिली नव्हती. घरासोबतच समाजकंटकांनी त्याच्या घरातील जीवनावश्यक साहित्यही जाळून टाकले होते. त्यामुळे हे कुटुंब रस्त्यावर आले. त्याचे कुटुंबिय न्याय मिळण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. या पार्श्वभूमीवर आज सकाळी राज्याचे अनुसुचीत जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी शिरूर कासार येथे जावून भोसले कुटुंबियासोबत पारधी समाजाच्या इतर लोकांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या वेळी या समाजातील लोकांनी पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाबाबतही तक्रारी मेश्राम यांच्या कानावर घातल्या. ही सर्व परिस्थिती पाहून शिरूर कासार येथील भेट आटोपती घेत आष्टी तालुक्यातील जामगाव या ठिकाणीही अॅड. मेश्राम यांनी भेट देऊन आष्टी याठिकाणी अधिकार्यांची भेट घेतली. यामध्ये प्रामुख्याने आष्टी-पाटोद्याचे उपविभागीय अधिकारी वसिमा शेख, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग भोगले, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी श्रीमती मेश्राम, वनविभागाचे सर्व विभागस्तरीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरीक्षक या बैठकीला उपस्थित होते.