गणेश सावंत- 9422742810
एकीकडे धार्मिक ध्रुवीकरणात गुंतलेली आजची पिढी नव्हे तर आजचे सत्ता पिपासू पावलो पावली पहायला मिळतात. कुठं धर्माचा रंग चढवायचा, कुठं जातीचा रंग चढवायचा अन् कुठं जातीयवाद वाढवायचा एवढंच ध्येय सत्ताकारणामध्ये आजच्या राजकारण्यांसमोर आहे की काय ? हे राज्यात आणि देशात असलेल्या अस्वस्थतेवरून वाटते. लोकांच्या मुलभूत गरजा काय? त्याला किती महत्व द्यायचे, महत्व द्यायचे की नाही, यावर चिंतन -मंथन होण्यापेक्षा आज कुठल्या धर्माला कुठल्या धर्माच्या समोर उभे करायचे, कुठल्या जातीला कुठल्या जातीच्या समोर उभा करून पोरांची मस्तके भडकवायची एवढाच धंदा स्पष्ट ना स्पष्टपणे सांगायचं झालं तर काही राजकारण्यांचा सुरूय… म्हणूनच नागपुर सारखी दंगल घडते. परंतु, राजकारण्यांच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या मनसुंब्याला थेट वेसन घालण्याचे कामही याच महाराष्ट्रात काही नव्हे तर कित्येक लोक करतांना दिसतात. माणूस जन्म मिळाला तो सार्थकी झाला परंतु हा जन्म निरर्थक धार्मिक आणि जातीय द्वेषातून कसा काळा निळा पडेल आणि जन्मलेला माणूस स्मशानात नाही तर कब्रस्तानात जाईल याची नीट व्यवस्था जाथ्ंयद्यांकडून केली जाते. परंतू

कोण स्मशानात
कोण कब्रस्तानात
जाईल. हे तर निश्चित, जन्माला आलेला माणूस एक ना एक दिवस स्मशानात नाही तर कब्रस्तानात जाणारच आहे. उरणार ते त्याचे कर्तव्य, कर्म… जगतजेता सिकंदर रिकाम्या हाताने आला अन् रिकाम्या हातानेच गेला. परंतू असे कित्येक समाजसुधारक, संत महात्मे, राजे- महाराजे होवून गेले की त्यांच्या कतृत्व कर्मातून आजही तुम्ही-आम्ही काही तरी शिकतोय अथवा त्यांच्या कतृत्व कर्माबरोबर त्यांनी दाखवलेल्या दिशेतून अथवा मार्गातून आजही आपण पदक्रंत होतोय. म्हणून माणसाने माणूस जन्मात आल्यानंतर जातीला अथवा धर्माला महत्व देण्यापेक्षा कर्तव्य कर्माला अणण्णय साधारण महत्व द्यावे तेव्हा कुठे जन्नत मिळेल अथवा वैकुंठ कधी मुस्लमानाचा तिरसकार करायचा कधी हिंदूंना भडकवायचे यांच्यात काही वाद झालेच नाही तर दलित सवर्ण समोर करायचे, यांच्यातही काही होत नाही तर मग अन्य छोट्या छोट्या जातींना आप आपसात भिडवायचे आणि स्वतः मात्र वैकुंठाचे स्वप्न पाहात नरकाची वारी करायची हे गोरख धंदे उभा महाराष्ट्र पाहतोय. औरंगजेबाच्या कब्ररीपासून नागपुरच्या दंगलीपर्यंत क्लूशित वातावरण असतांना तिकडे पुण्यात
ब्राम्हणाच्या वैकुंठासाठी
एक दाडीवाला, टोपीवाला पुढं सरसावला. ब्राम्हण कुटूंबातील एक बहिण आपल्या भावाचा मृत्यू होतो तेव्हा मला कोणी नाही, माझ्या भावाचा अंत्यसंस्कार करायचाय असे म्हणतेय तेव्हा ’पुणे‘ ‘कर’ धावायला पाहिजे होते. परंतू इथे धावला तो मुस्लमान त्याचा सर्वात मोठा सण त्याचे सर्वात पवित्र दिवस रमजानचे सुरू झाले होते. अल्लाहने आपल्या हातून हे कार्य सिध्दीस न्ह्यावे यासाठीच आपल्या हाती हे काम सोपवलं म्हणत जावेद खान नावाच्या मुस्लिम समाजातील व्यक्तींने ब्राम्हण समाजातील सुधीर किंकाळे यांचा विधीवत अंत्यसंस्कार केला. जावेद खान म्हणाले, मला मित्राचा फोन आला त्याने घटना सांगितली जयश्री किंकाळे, सुधीर किंकाळे हे वृध्द भाऊ- बहिण राहतात. सुधीर किंकाळे यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी करतो को जावेद खान तात्काळ ससूण रूग्णालयात पोहंचले तेव्हा सायंकाळ झाली होती. त्यांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली परंतू जयश्री किंकाळे म्हणाल्या आमच्या ब्राम्हण समाजामध्ये रात्रीचे अंत्यसंस्कार करत नाहीत तेव्हा जावेद खान यांनी दुसर्या दिवशी सकाळी अंत्यसंस्कार करूअसे म्हणत जयश्री यांना धीर दिला. तुमचे नातेवाईक असो किंवा नसो आपण विधीवत अंत्यसंस्कार करू असा विश्वास दिला. पवित्र रमजानच्या महिन्यात जावेद खान यांनी त्या ब्राम्ह समाजाच्या व्यक्तींवर अत्यसंस्कार केले आणि तिथेच
मुसलमानाने वैकुंठाचा मार्ग
आपल्या कतृत्व कर्मातून दाखवून दिला. एकीकडे कबरीचे राजकारण करत स्वतःला हिंदूवादी समजणारे तथाकथीत धर्मांग जयश्री किंकाळेंच्या किंकाळ्या एैकायला नव्हते. त्या बहिणीचे आश्रु पुसायलाही पुण्यात कोणी हिंदूवादी पुढे सरसावले नव्हते. ते कार्य एक मुस्लिम आणि एक ख्रिश्चन बांधवांच्या हातून होणे होते. म्हणूनच आम्ही सातत्याने म्हणतो. जगाच्या पाठीवर जे तीन सर्वात्कृष्ट धर्म ग्रंथ आहेत. गीता, कुरान आणि बायबल या तिन्ही धर्मग्रंथाचे एका व्याक्यात सांगणे आहे. गीता कहैती है त्याग करो, कुरान कहैता हे यकीन करो, बायबल कहैता हे प्यार करो आणि जेव्हा या तीन धर्मग्रंथाच्या त्याग, यकीन आणि प्यार या संदेशाचा मर्म जेव्हा सर्व सामान्यातील सर्व सामान्याला समजतो तेव्हा नर्क किंवा जहांन्नुम दिसत नाही तर तिथं दिसते जन्नत, स्वर्ग, वैकुंठ.
वैकुंठाची व्याख्या काय?
अथवा अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रख हे म्हणण्याचा अधिकार कोणाला. आमच्या अल्प बुध्दीला एवढेच माहित, वैकुंठाची व्याख्या ही चांगले कर्तव्य कर्म आणि अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रख हे म्हणण्याचा अधिकार ही त्यालाच जो स्वतःच्या धर्माचा गर्व करत असेल परंतु दुसर्याच्या धर्माचा अनादर करणार नाही. जावेद खान यांनी पवित्र रमजान महिन्यामध्ये जे कर्म केलं ते कर्म महाराष्ट्र आणि अखंड हिंदूस्तानात धार्मिक जातीय ध्रुवीकरण करू पाहणार्याच्या कानशिलात सन सनीत चपराक म्हणावे लागेल. जगदगुरू संत तुकोबा वैकुंठावर भाष्य करतांना म्हणतात.
वैकुंठा जावया तपाचे सायास ।
करणें जीवा नाश करणे बहु ॥1॥
तया पुंडलिकें केला उपकार ।
फेडावया भार पृथ्वीचा ॥2॥
तुका म्हणे सोपी केली पायवाट ।
पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥3॥
अर्थ
पूर्वी लोकास वैकुंठाला जाण्यासाठी तपश्चर्यासारखे कष्ट करावे लगत असत; त्यामध्ये जीवही गमवावा लगत असे .पण भक्त पुंडलिकाने भक्तांवर मोठा उपकार केला आहे; त्याने दाखविलेल्या भक्तीमार्गामुळे पृथ्वीवरच्या दुर्जनांचा भार कमी झाला .तुकाराम महाराज म्हणतात, की वैकुंठाची अवघड पायवाट सोपी झाली आहे, ही पायवाट म्हणजे पंढरीच्या रूपाने पृथ्वीतलावर वैकुंठ आले आहे.
आम्ही ही म्हणतो धार्मिक द्वेष पसरवण्यापेक्षा, जातीयवाद करण्यापेक्षा पुढार्यांच्या धार्मिक ध्रुवीकरणात गुंतण्यापेक्षा आपले कर्तव्य कर्म चारित्र्य स्वच्छ ठेवा इथे पृथ्वीवरच कुणाला वैकुंठ दिसेल कोणाला जन्नत लाभेल.