बीड : सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सेलिब्रिटी आणि नेतेमंडळी चांगलेच वैतागले आहेत. अनेकदा सेलिब्रिटींकडून ट्रोलर्संना आपण भाव देत नसल्याचे सांगत नेटीझन्सवर टीका केली जाते. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या ट्रोलिंगवरुन वाद होतानाही आपण पाहिले आहे. ट्रोलिंगच्या मुद्द्यावरुन कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी कडक कायदा करण्याची गरज व्यक्त केली. परळी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी, नागरिकांनीही संविधान जपण्याची गरज व्यक्त करत सोशल मीडियावरील (Social media) ट्रोलर्संसाठी कडक कायदा व्हावा, अशी अपेक्षा पंकजा मुंडेनी न्यायाधशींसमोरच व्यक्त केली.
परळी येथे नव्याने होऊ घातलेल्या न्यायालयाच्या निर्माणाधीन नूतन इमारतीमुळे न्यायदानाच्या प्रक्रियेस गती मिळणार असून प्रलंबित न्यायप्रविष्ट प्रकरणे देखील मार्गी लागणार आहेत. भविष्यातील गरजा आणि न्यायालयीन आवश्यकतांची परिपूर्ती या नूतन इमारतीच्या निर्माणातून होईल असा विश्वास याप्रसंगी पंकजा मुंडेंनी व्यक्त केला. याप्रसंगी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, न्यायमूर्ती मधुसूदन जोशी, न्यायमूर्ती आनंद यावलकर, ॲड.व्ही.डी.साळुंके, न्यायमूर्ती डी.आर.बोर्डे, ॲड.हरिभाऊ गुट्टे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज न्यायाधीशांसमोर बोलाव लागत आहे. सन 2009 मध्ये जून डाक बंगल्यात कोर्टाची इमारत होती, त्यावेळी वकील जीव मुठीत धरून काम करत होते कारण ती जुनी इमारत होती. सन 2011 मध्ये मुंडे साहेब खासदार आणि मी आमदार असताना आम्ही प्रयत्न केले आणि त्यावेळी ही जागा कोर्टाला भेटली. त्यानंतर, नगरोत्थान योजनेतून चाळीस कोटी निधी आणल्याची माहिती पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमातून दिली. न्यायालयाची इमारत बनवताना पर्यावरण पूरक इमारत बनवा, असा सूचनाही पकंजा मुंडे यांनी केल्या.
सोशल मिडिया ट्रोलर्संसाठी कडक कायदा हवा
बऱ्यावेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे आणि फेक अकाऊंट काढून ट्रोलिंग करतात. चुकीच्या पद्धतीने युट्यूब चॅनेल्स काढून खोट्या स्टोरीज तयार करतात. नुकतेच पहलगाममध्ये भ्याड हल्ला झाला, तेव्हा कुठलेही व्हिडिओ आपण प्रसारीत करु नये, असे आवाहन सरकारला करावे लागले. नागरिकांमध्ये ही जागृती असावी, यासाठी काही कडक कायदा असावा, जेणे करुन संविधान जपण्याची जबाबदारी नागरिकांनीही पेलली पाहिजे, असे पंकजा मुंडेंनी बीडमधील कार्यक्रमप्रसंगी बोलताना न्यायाधीशांना उद्देशून म्हटले. दरम्यान, न्यायदेवतेप्रमाणे सगळ्यांच्या डोळ्यावर पट्टी हवी, योग्य आणि अयोग्य मधला फरक ओळखता आला पाहिजे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांकडे अंगुली निर्देश केला आहे.