
बीड जिल्ह्यात बालविवाहाबाबत धक्कादायक अशी आकडेवारी समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या प्रजनन व बाल आरोग्य पोर्टलवरील नोंदीनुसार गेल्या वर्षभरात 18 वर्षांखालील 12 मुली गर्भवती झाल्याचं आढळलंय. तर तब्बल 11 मुलींची प्रसूती झाली असून त्यांचे वय 13 ते 17 वर्षे इतकं आहे. बीड, गेवराई, वडवणी, आष्टी, केज, धारूर, शिरूरकासार या तालुक्यांतील घटना यामध्ये समाविष्ट आहेत.
आरोग्य विभागाच्या आरसीएच पोर्टलवर गर्भवतींच्या नोंदीत अल्पवयीन मुलींच्या पतींचं नावही आहे. त्यामुळे मुलींचे बालविवाह झाल्याचं यातून स्पष्ट होतं. गेल्या वर्षभरात 12 मुली गर्भवती झाल्या असून त्यातल्या 10 मुलींचं वय फक्त 15 वर्षे इतकं होतं. तर बीड जिल्हा रुग्णालयात 13 ते 17 वयोगटातल्या 11 मुलींची प्रसूती झाली. यातल्या बहुतांश मुली या लैंगिक अत्याचाराच्या बळी होत्या.
बालविवाह प्रतिबंधक कायदा काय सांगतो?
बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 नुसार 18 वर्षांखालील मुलींचा आणि 21 वर्षांखालील मुलांचा विवाह बेकायदेशीर आहे. या काययद्यानुसार, बालविवाह लावून देणार्या पालक, मध्यस्थ व नातेवाईकांना दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बालविवाहाची खळबळजनक आकडेवारी समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
बीडमध्ये साखर कारखान्यात काम करणार्या स्थलांतरित मजुरांमध्ये बालविवाहांचं प्रमाण जास्त आहे. आर्थिक अडचणी, मुलींच्या सुरक्षेची भीती यांसारख्या कारणांनी पालकांकडून मुलींचं लग्न लावून दिलं जातं. बालविवाहांमुळे अल्पवयीन मुलींची गर्भधारणा, नवजात बाळासह मुलींच्या जीवालाही धोका निर्माण होतो. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.