
जिल्ह्यात महाराजांची जयंती उत्साहात
पुतळा प्रकरणी सहा तरूण चौकशीसाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात
बीड, (रिपोर्टर)ः- स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने मध्यरात्री बीड शहरालगतच्या बायपास रोडवरील लक्ष्मी चौकात शंभू भक्तांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला. सदरचा पुतळा हा संबंधित तरूणांनी स्वखर्चातून उभारल्याचे सांगण्यात येते. मात्र सदरचा पुतळा उभारण्यात आल्यानंतर पाच ते सहा शंभू भक्तांना बीड ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विना परवाना जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणावर व्यासपिठ उभारल्या प्रकरणी तीन ते चार तरूणांना बीड शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते. जिल्हाभरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होत आहे.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल दिसून येत असून बीड शहरासह जिल्हाभरातल्या ग्रामीण भागात छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष होत आहे. अनेक ठिकाणी रॅली काढण्यात आल्या तर संध्याकाही महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक अनेक ठिकाणी आयोजित केली आहे. जयंतीनिमित्त बीडमध्ये मात्र एक वेगळी बातमी समोर आली आहे. बीड शहरालगतच्या बायपासवरील लक्ष्मी चौकात काही शंभू भक्तांनी मिळून स्वखर्चातून छत्रपती संभाजी महाराज यांचा उभा रेखीव पुतळा रात्रीतून बसवला. फटाक्याची आतिषबाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करत तरूणांनी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला आहे. सदरची माहिती ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पाच ते सहा तरूणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणावर कार्यक्रमानिमित्त व्यासपिठ उभारण्यात आले. विना परवाना व्यासपिठ उभारले गेल्याने तिथेही तीन ते चार तरूणांना बीड शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते.





