गेवराई (रिपोर्टर): पुणे येथून कार्यक्रमानिमित्त गावी आलेले दाम्पत्य सिरसदेवी येथून रांजनगाव येथे जात असताना सिरसदेवी फाट्यावर बसमध्ये चढत असताना अज्ञात महिला चोरट्याने त्यांच्या बॅगमधील पर्समध्ये ठेवलेले तब्बल 10 तोळे सोने चोरल्याची घटना काल घडली. आपल्या पर्समधील सोने चोरीस गेल्याचे सदरच्या दाम्पत्यांना ते घोडनदी परिसरापर्यंत गेल्यानंतर लक्षात आले. या प्रकरणी तलवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सिरसदेवी फाट्यावर महिला चोरट्यांचा सातत्याने वावर पहायला मिळतो. गेल्या काही दिवसांपूर्वी एका महिला चोरट्यास तेथील लोकांनी मारहाणही केल्याचे सांगण्यात येते. महिला चोरटे या भागात सातत्याने फिरत असताना पोलिस मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जाते.
गेवराई तालुक्यातील रुई येथील उषा रखमाजी कादगे या गेल्या काही वर्षांपासून आपल्या मुलाकडे रांजनगाव (ता. शिरूर) येथे राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावी त्यांच्या दिराच्या घराची वास्तू शांती होती त्यानिमित्त उषा व त्यांचे पती हे आले होते. 15 मे रोजी सकाळी 9.20च्या सुमारास कादगे दाम्पत्य पुणे येथे जाण्यासाठी सिरसदेवी फाटा याठिकाणी बसची वाट बघत थांबले होते. त्या दरम्यान माजलगाव ते मानगाव जाणारी बस त्याठिकाणी आली, बसमध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे जागा पकडण्यासाठी कादगे याचंयासह अन्य पंधरा ते वीस प्रवासी बसच्या दारा जवळ आले. त्यावेळी सोन्याची पर्स ठेवलेल्या बॅगला जोरदार झटका लागला. परंतु उषा यांनी गर्दीमुळे दुर्लक्ष केले. मात्र दुपारी तीन वाजता त्यांची बस ही शिरूर टोल प्लाझा ता. शिरूर जि. पुणे इथे आले तेव्हा त्यांनी सहज पर्स उघडून पाहिली तेव्हा आतमधील साडेचार तोळ्याचे मोठ्या पट्ट्याचे गंठण, दोन तोळ्याचे झुंबर, दोन सोनसाखळ्या, झुंबर वेल, पाच सोन्याच्या अंगठ्या, कानातील सहा बाळ्या, सोन्याच्या दोन नथ असा एकूण दहा तोळे म्हणजेच आजच्या बाजार भावानुसार 9 ते साडेनऊ लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी तलवाडा पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर फाट्यावर महिला चोरांचा वावर सातत्याने वाढला असून याकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांमधून होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच एका महिला चोरास सिरसदेवी फाट्यावर मारहाण करण्यात आली होती.