उद्या अजितदादा बीडमध्ये
बीड (रिपोर्टर): राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे उद्या बीड जिल्हा दौर्यावर असून त्यानिमित्ताने आजपासूनच जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. बैठकीबाबतच्या रंगीत तालीमही अधिकारी-कर्मचार्यांकडून करून घेतल्याचे सांगितले जाते. उद्या दिवसभर बैठका अजित पवार घेणार असून जिल्हा नियोजन समितीची महत्वपुर्ण बैठकही उद्याच आहे. सकाळी उपमुख्यमंत्री पवार हे अंबाजोगाई येथील कार्यक्रम आटोपून ते बीडमध्ये डेरेदाखल होणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकत्व आहे. आतापर्यंत अजितदादांनी बीड जिल्ह्यात दोन वेळेस येऊन जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे. जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक अजितदादांच्या उपस्थितीत उद्या होत आहे. तत्पूर्वी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे अंबाजोगाई येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. तेथून ते परळी येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम शासकीय आहेत. पुढे अजित पवार हे बीड शहरात डेरेदाखल होतील. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या बैठकीसह अन्य अधिकारी, कर्मचार्यांसोबत ते बैठका घेणार आहेत. बीड जिल्ह्याचा वार्षीक आराखडा, निधीबाबत चर्चा, बीडची कायदा व सुव्यवस्था यासह अन्य प्रश्नांचीही अजित पवार हे माहिती घेणार असल्याचे सांगण्यात येते. अजित पवार हे शिस्तबद्ध असल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकांमध्ये त्रुटी राहून ये म्हणून आजपासूनच जिल्हा प्रशासन सावधान मोडवर असून बैठकांची रंगीत तालीमही केल्याचे सांगण्यात येते.