
महाजनवाडी शिवारात मध्यरात्री थरार
नेकनूर (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात असलेल्या महाजनवाडीच्या शिवारात पवनचक्कीचे कार्यालय परिसरात साहित्य चोरण्याच्या इराद्याने आलेल्या चोरट्यांच्या दिशेने पवनचक्कीवरील सुरक्षा रक्षकाने गोळीबार केल्याने या गोळीबारात एक संशयित चोरटा जागीच ठार झाला. सदरची गोळीबाराची घटना ही रात्रीच्या दरम्यान घडली. घटनेची माहिऋती होताच घटनास्थळी नेकनूर पोलीसांनी धाव घेतली असून घटनेचा पंचनामा सुरू आहे. मृत व्यक्ती हा 20 ते 25 वर्षे वयोगटातला असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. सदरच्या गोळीबार घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून पवनचक्कीवरून सातत्याने वाद होताना दिसून येत आहे. एकीकडे शेतकरी विरुद्ध पवनचक्की अधिकारी यांचे जेवढे वाद होत आहेत तेवढ्याच पद्धतीने पवनचक्कीचे साहित्य मोठ्या प्रमाणावर चोरीस जात असल्याच्या घटनाही घडत आहेत. लिंबागणेश परिसरात असलेल्या महाजनवाडी शिवारात पवनचक्कीचे एक कार्यालय आहे त्याठिकाणी पवनचक्कीसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. या पवनचक्की प्रकल्प सुरक्षेसाठी रुपसिंग टाक नावाचा बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला आहे. आज मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान काही चोरटे या परिसरात घुसल्याची माहिती सुरक्षा रक्षकाला झाली. सदरचे चोरटे हे चोरीच्या उद्देशाने घुसले त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याठिकाणी वाद होत चोरट्याने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. या वेळी आत्मसुरक्षेच्या हेतुने सुरक्षा रीकाने चोरट्याच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात एक चोरटा जागीच ठार झाला. या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. दुपारी एक वाजेपर्यंत मृतदेह घटनास्थळावर पडून होता. सदरील मृत व्यक्ती कोण? त्याचा चोरीशी संबंध आहे की नाही? सुरक्षा रक्षकाकडे शस्त्र परवाना होता का? यासह अन्य प्रश्न उपस्थित होत असून या गोळीबाराच्या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. गोळीबार करणारा सुरक्षा रक्षक रुपसिंह टाक असल्याचे सांगण्यात येते. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
घटना अशी घडली…
सदरच्या पवनचक्कीवर सुरक्षा रक्षक म्हणून पाटोदा येथील रिटायर्ड मिलिट्रीमॅन रुपसिंग टाक हे कार्यरत आहेत. रात्री एक ते दीडच्या सुमारास रुपसिंह टाक हे कर्तव्य बजावत असताना चार अज्ञात चोरटे आतमध्ये घुसले. त्यांना रुपसिंह टाक यांनी प्रतिकार सुरू केला तेव्हा टाक यांच्यावर चोरट्यांनी धारदार शस्त्रांसह रॉडने हल्ला सुरू केला. या दरम्यान आत्मसुरक्षेसाठी टाक यांनी चोरट्यांच्या पायाच्या दिशेने गोळीबार केला. मात्र त्यातील एक जण उडी मारल्याने त्याच्या डोक्याला गोळी लागली. असे टाक यांनी म्हटले. टाक यांच्या म्हणण्यानुसार चोरट्यांनी फायरींग केली.