
भरती प्रक्रिया तात्काळ राबवा, बेरोजगारी कमी होईल
बीड, (रिपोर्टर)ः- बीडच्या जि.प.मध्ये अनुकंपाची गेल्या दोन वर्षापासून भरती करण्यात आलेली नाही. प्रतिक्षा यादीमध्ये अनेकांची नावे आहेत. भरती प्रक्रिया राबविली असती तर कित्येकांना त्याचा लाभ झाला असता आणि बेरोजगारी देखिल कमी झाली असती. भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी अनुकंपा धारकांच्या वतीने केली जात आहे.
बीड जिल्हा परिषदेमध्ये 2021-2022 मध्ये नियमित भरती प्रक्रिया पार पडली होती. मात्र 2023-2024 या वर्षासाठीच्या भरती प्रक्रियेला अद्याप सुरूवात झालेली नाही. ही भरती डिसेंबर 2023 मध्ये पूर्ण होणे अपेक्षीत होते. तसेच डिसेंबर 2023 मध्ये कागदपत्राची पडताळणी देखिल पूर्ण झाली असून नियुक्त्या झालेल्या नाहीत. या विलंबामुळे अनेक उमेदवारांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. बेरोजगारीचा प्रश्न अतिगंभीर होत असून भरती प्रक्रियेला विलंब होता असल्याने काहींचे वय निघून जात आहे.
2023 च्या प्रतिक्षे यादीत 185 उमेदवार होते तर 2024 मध्ये हा आकडा 250च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. बीड जि.प. व्यतिरिक्त इतर जि.प.मध्ये नियमित भरती प्रक्रिया पार पडत आहे. मात्र जिल्ह्यात हा मुद्दा प्रलंबित आहे. शिक्षण सेवक या पदाच्या 20 टक्के जागा भरता याव्या यासाठी आठ ते नऊ महिने झाले मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्रालयातून याचा पाठपुरावा अधिकारी करत नाहीत. नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजी नगर या जि.प.ने अनुकंप प्रतिक्षा यादी 0 टक्कयांवर आणली आहे. 2023 मध्ये भरती झाली असती तर परिचालक हे पद भरता आले असते. तरी जि.प.ने तात्काळ अनुकंप भरतीला गती द्यावी अशी मागणी अनुकंप धारकांच्या वतीने करण्यात आली आहे.