
100 टक्के फॉल्टी; सुरेश धस यांचा मोठा आरोप
बीड (रिपोर्टर):
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात बावधन पोलिसांकडून तपासाला वेग आला आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महिला आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातच बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण लावून धरणारे भाजपा नेते सुरेश धस यांनी आता वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठे आरोप केले आहेत.
बीडमध्ये एका सभेत बोलत असताना सुरेश धस म्हणाले की, आयजी पोस्टवर असलेला माणूस रोख 1 लाख रुपये चेकद्वारे घेतो. 50 हजारांचा मोबाइल घेतो, यापेक्षा दुर्दैव काय असावे. जालिंदर सुपेकरबाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. जेलमध्ये आरोपींना 300 कोटी रुपये दे, असे म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. नातेवाईकांच्या सुनेकडून पैसे मागता, याचा अर्थ सुपेकर हा 100 टक्के फॉल्टी आहे, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, नैतिकता नावाची गोष्ट राहिलेली नाही. गोष्टी किती खालच्या थराला गेल्यात याचे हे उदाहरण आहे. हगवणे कुटुंबाची 150 कोटींची मालमत्ता आहे. आता ही प्रॉपर्टी जाळायची की पेटवायची. असे लोक तुरुंगातून कितीही वर्षांनी बाहेर आले तरी समाज त्यांच्यावर शेण हाणणार आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर जाऊन शेण फेकले. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी टोमॅटो फेकले. नुसते टोमॅटो हाणून उपयोग नाही, यांच्यावर कवटं हाणायला हवेत, या शब्दांत सुरेश धस यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, भविष्यात कुणी केले नाही, तर आष्टी मतदारसंघाने याबाबत तयारीत राहावे. हगवणे कुटुंब जामिनावर सुटले तर त्यांच्यासाठी एक गाडी आणि कवटं तयार ठेवा. सापडले तर सुपेकरांबाबतही हेच करायला हवे, असे धस म्हणाले. दुसरीकडे, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध आढळून आल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली होती. तसेच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी तर सुशील आणि राजेंद्र हगवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.





