
गृहविभागाची थेट कारवाई
बीड (रिपोर्टर): संतापजनक आणि मन हेलावून टाकणार्या साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात अखेर मोठी कारवाई झाली आहे.
या प्रकरणातील आरोपी महिला पोलीस शिपाई शितल एकनाथ कदम हिला गृह विभागाच्या आदेशाने निलंबित करण्यात आले आहे. मानसिक छळाला कंटाळून साक्षीने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप शीतल कदम या आरोपी महिला शिपायावर आहे.

14 मार्च 2025 रोजी धाराशिवमध्ये साक्षी कांबळे हिने गळफास घेवून आत्महत्या केली. शितल कदम आणि अभिषेक कदम या दोघांच्या मानसिक छळाला कंटाळून तिने टोकाचा निर्णय घेतला. हे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गृह विभागाने शीतल कदम हिच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. शीतल कदम ही मुंबई रेल्वे पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत होती. या प्रकरणाची एफआयआर धाराशिव येथे नोंदवण्यात आली होती. आणि तपासाची जबाबदारी तेथील डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र तपासाच्या सुरुवातीपासूनच गंभीर त्रुटी झाल्या. उपमखुमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची दखल घेत या तपासातून स्वप्नील राठोड यांची हकालपट्टी केली. यांच्याकडील तपास काढून कळंब येथील पोलिस उपअधीक्षक संजय पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुख्य आरोपी अभिषेक कदम तब्बल 20 दिवसांनी स्वतःहून पोलिसांत हजर झाला होता. आणि अवघ्या 7 दिवसांत त्याला जामीन देखील मिळाला यामुळे प्रकरणात गंभीर संशय निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर दुसरी आरोपी असलेल्या महिला पोलीस शिपाई शितल एकनाथ कदम हिला निलंबित करण्यात आलं आहे.
गृह विभागाने ही कारवाई करत प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट केलं आहे. साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरण आता न्यायाच्या निर्णायक वळणावर आहे. उशिरा का होईना, पण आरोपींवर केलेली ही कारवाई न्यायाच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. दरम्यान साक्षीची आई कोयना यांनी हे प्रकरण जलद गतीने चालवावी अशी विनंती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.






