
स्वाभिमान संघटनेची निदर्शने; पीडिताने समोर यावे, तुमचा भाऊ पाठिशी आहे : प्रा.सचिन उबाळे
बीड(प्रतिनिधी) शहरातील शैक्षणिक हब म्हणून प्रसिध्द असलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुलमध्ये क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थीनीसोबत गैरप्रकार केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आज स्वाभिमान संघटनेच्या वतीने उमाकिरण शैक्षणिक संकुलासमोर जोरदार निदर्शन करण्यात आली. उमाकिरण प्रकरणी उद्या दि.28 जून रोजी शहरात स्वाभिमान संघटनेच्या वतीने सर्वपक्षीय शैक्षणिक बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे यांनी यावेळी दिली.
उमाकिरण येथे मोठ्या प्रमाणात खासगी क्लासेस चालतात. या ठिकाणी बीडसह बाहेरील जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र उमाकिरण संकुलातील एका क्लासेसमधील दोन शिक्षकांनी विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्या प्रकरणी काल बीडमध्ये पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळीमा लावणार्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने आज उमाकिरण शैक्षणिक संकुल येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा.सचिन उबाळे म्हणाले की, पीडिताने समोर येऊन सर्व माहिती द्यावी, तुमचा भाऊ म्हणून मी कायम पाठिशी आहे. या प्रकरणी उद्या दि.28 जून रोजी शहरात शैक्षणिक बंद पाळण्यात येणार असल्याचे प्रा.उबाळे म्हणाले







