
शैक्षणिक संकुल बंद; पालकांचा गराडा, पोलिसांचा तगडा फौजफाटा
गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय पवारसह त्याचा साथीदार फरार
शोधासाठी पोलिसांचे तीन पथके, फरार करण्यास मदत करणार्यांवर गुन्हा दाखल करा, लोकांची मागणी
बीड (रिपोर्टर): बीड शहरात नावाजलेल्या प्रोफेशनल क्लासेस व उमाकिरण शैक्षणिक संकुलचे संचालक तथा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक विजय पवार आणि त्याचा सहकारी प्रशांत खाटोकर या दोघांविरोधात एका अल्पवयीन मुलीने तक्रार केल्यानंतर रात्री पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज पालकांनी उमाकिरण शैक्षणिक संकुल परिसरात मोठी गर्दी केल्याने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याने या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. उमाकिरण कोचिंग क्लासेस आज बंद ठेवण्यात आले असून गुन्हा दाखल झालेला विजय पवार आणि त्याचा सहकारी प्रशांत खाटोकर हे फरार झाले आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने तीन पथके रवाना केले आहेत.

आपल्या पाल्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी आज प्रत्येक पालक मोठ्या विश्वासाने आपल्या मुला-मुलींना शिकवणीसाठी विविध क्लासेसमध्ये पाठवतात. परंतु ज्याच्याकडे गुरू म्हणून पाहिलं जातं, ज्याने मुला-मुलींना उज्ज्वल भविष्याची वाट दाखवायला हवी, अशा शिक्षक गुरूंकडून विद्यार्थीनींचा लैंगिक छळ केला जात असल्याने पालकवर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. बीडमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून विजय पवार याचे प्रोफेशनल क्लासेस आहेत. त्यापाठोपाठ त्याने संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलची स्थापना केली आहे. त्यापाठोपाठ नीट इंजिनिअरींगच्या विद्यार्थीनींसाठी उमाकिरण शैक्षणिक संकुलचा संचालक म्हणूनही तो काम पाहत आहे. 2024 पासून एका अल्पवयीन मुलीचा विजय पवार आणि त्याचा सहकारी खाटोकर हा लैंगिक छळ करत असल्याचे समोर आले आहे. मुलीने तक्रारीत स्पष्टपणे आपला छळ होतो, आपले फोटो काढले, त्याचबरोबर हे दोघेही आपल्याला बॅड टच करतात, असे म्हटले आहे. तिच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसात रात्री गुन्हा दाखल झाला मात्र आज संतापलेल्या पालकांनी उमाकिरण संकुलला गराडा घातला. कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहावी म्हणून पोलिसांनी या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त उभारला.
सामाजिक कार्यकर्त्यांनी संतप्त होत निदर्शने, आंदोलने सुरू केली आहेत. विजय पवार हा स्थानीक आमदार संदीप क्षीरसागर यांचा समर्थक आहे. तो आणि त्याचा साथीदार सध्या फरार असून त्याला फरार करण्यामध्ये साथ देणार्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांतून होत आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांचे तीन पथके रवाना झाल्याचे सांगण्यात येते. आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सदरची घटना अत्यंत गंभीर असल्याने ती विद्यार्थ्यांशी निगडीत असल्याने पालकांत प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे.
आरोपींना आमदाराने फरार केले; उपस्थितांचा आरोप
उमाकिरण कोचिंग संकुलचा संचालक विजय पवार आणि त्याचा साथीदार खाटोकर या दोघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला. तो दाखल होऊ नये म्हणून आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर आरोपींना त्यांनीच फरार केले, असे थेट आरोप जमावातील उपस्थितांनी केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना तात्काळ अटक करा आणि त्यांना मदत करणार्यांवरही गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत उपस्थितांनी घोषणाबाजी केली.






