बीड (रिपोर्टर) महावितरण कंपनीने शेतकर्यांच्या संमतीविना त्यांच्या शेतामध्ये वीजवितरण कंपनीचे खांब, डीपी बसवलेल्या आहेत. मात्र हे खांब आणि डीपी बसवताना शेतकर्यांची संमती घेतलीच नाही, म्हणून किमान या जागेचे भाडेतरी द्यावे म्हणून काही शेतकरी औरंगाबाद खंडपीठात गेले होते. त्याबाबत बीड जिल्हाधिकार्यांनी नव्वद दिवसात निर्णय घ्यावा, असे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले आहेत.
दौलावडगाव आणि पिंपळा या दोन गावच्या शेतांमध्ये विद्युत वितरण कंपनीने वीजेचे खांब आणि डीपी बसवलेल्या आहेत. याबाबत वारंवार वीजवितरण कंपनीला या दोन गावच्या शेतकर्यांनी विचारना केली असता वितरण कंपनीकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अॅड. अजित काळे यांच्या मार्फत या शेतकर्यांनी मार्च महिन्यामध्ये औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल केली होती. या याचीकेवर सुनावणी होऊन बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी नव्वद दिवसात निर्णय घ्यावा, असे आदेश खंडपीठाचे न्यायाधीश रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती अनिल पेंडणेकर यांनी दिले आहेत.