Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home बीड भाविकांचे दर्शन धोकादायक

भाविकांचे दर्शन धोकादायक


नियमाने तिर्थक्षेत्राला दरवर्षी एक लाख भाविकांची ये-जा असणे गरजेचे, अशा तिर्थक्षेत्रातालाच दर्जा देता येतो; ज्या अर्थी अनेक देवस्थाने अशी आहेत की तेथे जाण्यासाठी रस्ताच नाही तर मग भाविक जाणार कसे? व संबंधित सेवक १ लाख लोकसंख्या दाखवणार कोठुन?
तिर्थक्षेत्राला दर्जा नसल्याने निधी नाही, म्हणून अनेक ऐतिहासीक तिर्थक्षेत्र दुर्लक्षीत; आता ग्रामस्थांनी ग्रामस्तरावर पुढाकार घेण्याची गरज
अनेक वेळा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तिर्थक्षेत्राताला दर्जा द्यावा म्हणून मागणी,नियोजन समितीतून तिर्थक्षेत्रासाठी विशेष तरतूद परंतू मागणी करणारे नंतर प्रस्ताव सादर करत नसल्याने तिर्थक्षेत्र दुर्लक्षित, आता निवेदन सोबतच ठराव सादर करण्याची सूचना
हमखास मरीआई, सटवाई देवी, लक्ष्मी, डोंगरावरील दर्गाह, मंदिर व काही देवस्थानांची बीकट अवस्था; जाण्यासाठी रस्ता नसल्याने डोंगर चढुन काट्या कुपाट्यातून भाविक काढतात वाट, भाविकांच्या जिविताला मोठा धोका
काही ठिकाणी भाविक करतात स्वखर्चाने देवस्थानांची देखभाल, गावात संंबंधित देवस्थानाच्या समित्या गठीत नसल्याने तिर्थक्षेत्राचा विकास खुंटला; समन्वयातून काम होणे गरजेचे
किमान पुरातत्त्व खात्याने तिर्थक्षेत्रातील ऐतिहासीक वास्तू जतन करण्यासाठी विशेष पथक नेमण्याची गरज; अनेक तिर्थक्षेत्रातील शिल्पकला होतायत नष्ट, तिर्थक्षेत्राताला दर्जा नसल्याने सर्वांकडूनच दुर्लक्ष
प्रशासन तिर्थक्षेत्राच्या विकास कामासाठी तत्पर परंतू संबंधित तिर्थक्षेत्राचे सेवकच उदासीन, प्रशासनाने भाविकांची सुरक्षा म्हणून आपल्यास्तरावर किमान रस्ते तरी करून घ्यावे जेणेकरून भाविकांसोबत दुर्घटना घडणार नाही
वरवटी येथील सटवाई देवीला जातांना दुचाकीचा प्रवास, समनापूर दावलमलिक साहेब व पालीची दर्गाह येथे दर्शनाला जातांना डोंगर चढतेवेळी अंगावर शहारे येतात,लहान बालके,महिला,वृद्ध,श्रद्धेपोटी घेतात रिस्क
जिल्ह्यात ‘अ’ दर्जाची तिर्थक्षेत्र तर नाहीच ‘ब‘ व ‘क‘ दर्जाची अनेक तिर्थक्षेत्र असल्याची बांधकाम विभागात नोंद तर काही तिर्थक्षेत्राच्या नोंदी नगर पारिषद अंतर्गत


तिर्थक्षेत्राच्या देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडे विशेष तरतूद केलेली आहे. पुर्वीपासूनच देवस्थान, दर्गाह यांची निगराणी, देखभाल करणार्‍या सेवकांना शेकडो एक्कर जमिन इनाम म्हणून घोषीत केलेली आहे. या मागचा शासनाचा मुख्य उद्देश म्हणजे इनामी जमिनीतून होणारे उत्पन्न आणि त्या उत्पन्नातून संबंधित दर्गाह, देवस्थानाची देखभाल. त्या व्यतिरीक्त राज्य शासन तिर्थक्षेत्रासाठी विशेष निधी देवून त्या तिर्थक्षेत्राची देखभाल दुरूस्ती करून घेते. यासाठी राज्य शासनाने तिर्थक्षेत्राला दर्जा दिला. यात ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशा प्रकारे दर्जा देण्यात आलेला आहे. ‘अ’ दर्जात मोठी तिर्थक्षेत्र येतात. त्यानुसार त्याप्रमाणेच ‘क’ आणि ‘ब’ दर्जा तिर्थक्षेत्राला देण्यात आलेला आहे. दर्जानुसार संबंधित तिर्थक्षेत्राला निधी दिला जातो. परंतू अनेक तिर्थक्षेत्र असे आहेत की ज्यांना कोणत्याही प्रकारचा दर्जा नसल्याने त्यांची देखभाल दुरूस्ती करण्याची जिम्मेदारीही प्रशासनाची नाही. यासाठी संबंधित गावातील ग्रामस्थ स्वखर्चानेच संबंधित तिर्थक्षेत्राची देखभाल दुरूस्ती करतात. म्हणूनच अनेक तिर्थक्षेत्र पाहिजे तसे सुसज्ज स्थितीत नाही. परंतू अनेक तिर्थक्षेत्र असे आहेत की तेथे जाण्यासाठी साधे रस्तेही नाहीत. अनेक वेळेस तिर्थक्षेत्राला जातांना भाविक जखमी झाल्याची घटना पण घडलेली आहे. याला जिम्मेदार कोण? हा प्रश्‍न सर्वासमोरच उपस्थित होतो. प्रशासन म्हणते की, दर्जा असलेल्या तिर्थक्षेत्राला मुबलक निधी आहे. अनेक वेळा निधी परत जातो. परंतू दर्जा नसल्याने प्रशासन पुढाकार घेवून संबंधित तिर्थक्षेत्राचा विकास करू शकत नाही. संबंधित ग्रामस्थ आपल्या गावातील तिर्थक्षेत्रासाठी पुढाकार घेतात. जिल्हा परिषद बांधकाम विभागात पत्र देतात. ते पत्र नियमाने जिल्हा नियोजन समितीसमोर ठेवण्यात येते. नियोजन समितीतील संबंधित अधिकारी तिर्थक्षेत्राची देखभाल दुरूस्ती व्हावी म्हणून पुढाकार घेतात. नियोजन समितीमध्ये संबंधित अर्जाची दखल होवून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देतात आणि त्याचवेळी नियमाच्या कचाट्यात अडकलेले सेवक फक्त तिर्थक्षेत्राला दर्जा मिळावा म्हणून पत्र व्यवहार करतात आणि दर्जा मिळवण्यासाठी नियम आणि कागदपत्राची पुर्तता होत नसल्याने नंतर हेच सेवक माघार घेतात. अशा अनेक कचाट्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील तिर्थक्षेत्र दुर्लक्षित होत असून यासाठी आता प्रशासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी भाविक स्वत: जीवाची पर्वा न करता धोकादायक (रिस्की) दर्शन घेतात. डोंगरावर असलेल्या तिर्थक्षेत्रापर्यंत पोहचण्यासाठी थरकाप होतो. परंतू श्रद्धेपोटी भाविक कोणताही धोका घेण्यास तयार असून या भाविकांच्या जिविताला धोका होवू नये म्हणून प्रशासनाने तिर्थक्षेत्रासंदर्भात विचार करण्याची गरज असून ग्रामस्थांनी आपल्यास्तरावर संबंधित देवस्थान, दर्गाह याची देखभाल करावी व गावागावात संबंधित सेवकांना विश्‍वासात घेवून समिती तयार करावी. जेणेकरून तिर्थक्षेत्राचा विकास खुंटला जाणार नाही. विशेष म्हणजे तिर्थक्षेत्राच्या दुर्लक्षामुळे तिर्थक्षेत्रातील ऐतिहासीक वस्तू शिल्पकला नष्ट होत चालल्या आहेत. किमान पुरातत्त्व विभागाने याकडे लक्ष देवून तिर्थक्षेत्रातील ऐतिहासीक कला जतन करण्यासाठी विशेष पथक नेमुण राज्यातील दुर्लक्ष तिर्थक्षेत्राची पाहणी करणे गरजेचे आहे.

बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रत्येक वेळेस तिर्थक्षेत्राला दर्जा मिळावा म्हणून संबंधित गावातील ग्रामस्थ आपल्या नेत्याच्या माध्यमाने अर्ज करतात. नियोजन समिती पुढाकार घेवून तिर्थक्षेत्राचा प्रश्‍न असल्याने तात्काळ त्या पत्राची दखल घेतात व संबंधित तिर्थक्षेत्राचा प्रस्ताव मागवितात. नियमाने त्या तिर्थक्षेत्राची एक समिती असणे, त्या तिर्थक्षेत्रावर दरवर्षी किमान १ लाख भाविक येणे असे अनेक नियमाचे पालन करून प्रस्ताव तयार करावा लागतो. यावेळी एक महत्त्वाचा प्रश्‍न असा उपस्थित होतो की, डोंगरावर, काट्याकुपाट्यात, छोटे-मोठे तिर्थक्षेत्र आहेत. त्या तिर्थक्षेत्राची गरज भाविकांना दिवसाआड असते. अनेक भाविक अशा ठिकाणी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डोंगर चढून काट्याकुपाट्यातून मार्ग काढुन दर्शन घेतातच. यात डोंगरावरील तिर्थक्षेत्र दर्शनसाठी जात असतांना अनेक वेळेस दुर्घटना घडल्या. बालके आणि वृद्ध अशा घटनेत जखमीही झालेले आहे. परंतू दर्जा नसल्याने या तिर्थक्षेत्राचा विकास होत नसल्याचे दिसून येते. म्हणूनच जिल्ह्यातील अनेक तिर्थक्षेत्र दुर्लक्षित झाले असून अनेक ठिकाणी दर्गाह, मंदिर जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे हमखास मरीआई, सटवाई देवी, लक्ष्मी, डोंगरावरील दर्गाह, मंदिर व काही देवस्थानांची बीकट अवस्था झाल्याचे प्रत्येक गावातील चित्र आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता तर सोडाच तिर्थक्षेत्राला साधे छत ही दिसून येत नाही. ज्याअर्थी तिर्थक्षेत्राची हजारो एक्कर जमिन सेवकांसाठी बहाल केलेली आहे तर मग ते सेवक त्या जमिनीतून उत्पन्न घेवून संबंधित देवस्थानांची देखभाल दुरूस्ती का करत नाही? हा प्रश्‍न सर्वांसमोर उपस्थित असला तरी आज किती असे सेवक आहेत की ज्यांच्या ताब्यात संबंधित इनाम असून त्याचा लाभ मिळतो का? याचीही प्रशासनाने चौकशी करण्याची गरज आहे. एकंदरीत जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र दर्जात अडकली असून जोपर्यंत संबंधित ग्रामस्थ समन्वय करून पुढाकार घेणार नाही तोपर्यंत तिर्थक्षेत्र दर्जात अडकलेलेच राहणार. सुदैवाने आत्तापर्यंत भाविकांसोबत अशी काही दुर्घटना घडलेली नाही. त्यापुर्वीच प्रशासनाने पुढाकार घेतला तर जिल्ह्यातील तिर्थक्षेत्राचा विकास तर होणारच त्याशिवाय तिर्थक्षेत्रातील ऐतिहासीक कला याचीही जतन होईल.

प्रशासन तत्पर परंतू सेवक उदासीन
दरवर्षी जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच शहरी भागासाठी नगर पारिषद अंतर्गत तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी लाखो रूपयाचा निधी जिल्हा प्रशासनाला राज्य प्रशासन देतो. परंतू अनेक तिर्थक्षेत्राला दर्जा मिळाला नसल्याने तो निधी दर्जा नसलेल्या तिर्थक्षेत्रावर खर्च करता येत नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभाग तिर्थक्षेत्राच्या देखभाल दुरूस्तीसाठी अर्ज आल्यानंतर प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगतात. परंतू संबंधित सेवक प्रस्तावच्या कागदात अडकून पुन्हा तिर्थक्षेत्राचा विकास व्हावा म्हणून संबंधित विभागाकडे परत जात नाही. म्हणून अनेक तिर्थक्षेत्र फक्त कागदावरच आहेत. जोपर्यंत संबंधित तिर्थक्षेत्राला दर्जा मिळणार नाही तोपर्यंत निधी मिळणार नाही. यासाठी ग्रामस्थांनी संबंधित तिर्थक्षेत्राच्या सेवकांना मदत करावी जेणे करून दर्जाच्या कचाट्यात तिर्थक्षेत्र अडकणार नाही आणि विकासही होईल.

भाविकांना पाहुन
थरकाप होतोय

जिल्ह्यात अशी अनेक तिर्थक्षेत्र आहेत की, ज्या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी जातांना धोकादायक मार्गाने जावे लागते. या संदर्भात अनेक वेळेस भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. बीड तालुक्यातील समनापूर येथील माजी सरपंच दिलीप शेळके यांनी वरवटी येथे सटवाई देवीला जाण्यासाठी मार्ग नसल्याची माहिती दिली. त्याच प्रमाणे रिपोर्टरच्या प्रतिनिधीने वरवटी शिवारातील सटवाई देवी, समनापूर येथील डोंगरावरील दावल मलिक साहेब दर्गाह, पाली तलावावरील डोंगरावरची दर्गाह त्यांना भेट दिली. अनेक ठिकाणी रस्ते तर नाही शिवार समाधीला छतही नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे प्रत्येक गावातील प्रत्येकाला सटवाई देवी, मरीआई, लक्ष्मी, यांच्या दर्शनाची गरज असते. म्हणून अनेक भाविक या गावातून त्या गावात जावून आपआपल्या तिर्थक्षेत्राचे दर्शन घेतात. अनेक वेळा भाविकांना वाहनातून उतरल्यानंतर दोन-दोन, तीन-तीन किलोमीटर पायी प्रवास करून दर्शन घ्यावे लागते. सर्वात जास्त धोकादायक दर्शन म्हणजे डोंगर चढून दर्शन घेणे. त्यावेळेस मात्र भाविकासह त्यांना पाहणार्‍यांनाचाही थरकाप होतो.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...