शेतकर्याच्या कोठ्यातील शेळ्या केल्या चोरी
अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): शेतकर्यांच्या शिवारांमध्ये अलीकडच्या काही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटे शेतांमध्ये घुसून पिके, शेती साहित्य, मोटार पंप, बियाण्यांची पोती, तसेच कधीकधी गुरे ढोरे देखील चोरी करून नेत आहेत. काल नेकनूर मध्ये एका शेतकर्याच्या कोठ्यातील शेळ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला.
नेकनूर गावाजवळील एका शेतकर्याच्या कोठ्यात घडलेल्या चोरीच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कोठ्यातून तब्बल दहा शेळ्या व सात पिल्ले चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. नेकनूर मधील करचुंडी शिवारात 20 जुलै रोजी रात्री 6:30 ते दुसर्या दिवशी 6 वाजता एका अज्ञात चोरट्याने रामू जिजाबा शिंदे वय 35 वर्षे रा. करचुंडी या शेतकर्याच्या मोकळ्या जागेत बांधलेल्या कोठ्यातील उस्मानाबादी जातीच्या 10 शेळ्या व 7 पिल्ले असा एकूण 1,21,000 रुपयांची चोरी केली असून शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अज्ञात चोरावर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.







