
परळी (रिपोर्टर): परळी शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. बंद घराच्या दाराचे कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा दोन ते तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना परळी शहरातील टीपीएस कॉलनी भागात घडली. चोरट्यांनी परवा वकिलाचे घर फोडले. याची फिर्याद काल देण्यात आली.
याबाबत अधिक असे की, लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील अॅड. नंदकुमार बळीराम राठोड हे गेल्या काही दिवसांपासून परळीच्या टीपीएस कॉलनी भागात राहतात. 20 तारखेला ते घर बंद करून गावाकडे गेले. ते परतले तेव्हा त्यांच्या घराचा कडीकोंडा तुटल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला अणि कपाटाचे लॉकर तोडून आतमधील सोन्याचे गंठन, सोन्याचे मणी, सोन्याचा पत्ता, कानातील सोन्याचे सरपाळे, लहान मुलांच्या कानातील यासह पाचशे रुपयांच्या नोटा, एक मोबाईल असा एकूण दोन ते तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अॅड. नंदकुमार राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गु.र.नं. 154/25 कलम 305, 333, 331 (4) मा.न्या.सं.2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









