बीड | रिपोर्टर
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या आदेशांनंतर स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई करत अंबाजोगाई परिसरात गुटखा तस्करीचा मोठा साठा जप्त केला आहे. इनोव्हा क्रिस्टा कारमधून वाहतूक होत असलेला तब्बल ₹२५,२६,२००/- किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून वाहनासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
मा. पोलीस अधीक्षक, बीड यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उपविभाग अंबाजोगाई हद्दीत अवैध धंद्यावर कारवाईसाठी रवाना झाले होते. यावेळी पथकातील पोह/1429 केकान, पोह/1837 गिते, पोना/1918 भताने व पोअ.1055 अंधाळे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बर्दापूरहून अंबाजोगाईकडे गुटख्याची मोठी खेप इनोव्हा क्रिस्टा कारमधून येणार आहे.
प्राप्त माहिती लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेलू-अंबा रोडवरील टोल नाका येथे दोन पंचांसह पथक थांबले. काही वेळातच पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा (MH 14 GU 0699) टोलनाक्याकडे येताना दिसली. संशयावरून लगेच छापा टाकून सकाळी ५.०० वाजता (दि. 26.11.2025) वाहन अडवण्यात आले.
वाहनचालकाने आपले नाव फारोख हामिद सय्यद (वय 45, रा. सय्यद गल्ली, माजलगाव) असे सांगितले. त्यानंतर घेतलेल्या झडतीत वाहनामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विविध कंपनीचा ₹५,२६,२००/- किमतीचा गुटखा आढळला. वाहनासह गुटखा असा एकूण ₹२५,२६,२००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोस्टे अंबाजोगाई ग्रामीण येथे भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक बीड, मा. अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली व पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने केली.











