अंबाजोगाई | दि. २८ फेब्रुवारी २०२६
ऑनलाईन रिपोर्टर
रस्त्यावर मोटारसायकल आडवून सोनाराच्या डोळ्यात तिखट चटणी टाकत चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी सोनार हे सोने विक्रीसाठी जुन्या दिघोळअंबा मार्गे मोटारसायकलने जात असताना होळ–दिघोळअंबा दरम्यान दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार जणांनी त्यांची गाडी आडवली. आरोपींनी त्यांच्या डोळ्यात तिखट चटणी टाकून मारहाण केली आणि हातातील सोन्याची पिशवी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६/२०२६, कलम ३०९(६) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने सुमारे ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुप्त माहितीच्या आधारे संशयित रोहित रंजीत धिमधिमे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत इतर साथीदारांची नावे सांगितली.
या प्रकरणात अभिषेक अशोक घाटुळ (रा. कऱ्हेवाडी, ता. परळी), कानिनाथ दिलीप पुरकर (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई), यशोदीप कल्याण किधान (रा. सातेवळ, ता. अंबाजोगाई) यांच्यासह एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली (१,५०,००० रुपये), मोबाईल फोन (९०,००० रुपये) आणि सोन्याचे दागिने (३,००,००० रुपये) असा एकूण ५,४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सर्व आरोपींना पुढील तपासासाठी युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे








