बीड – बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) यांना मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक शेख तय्यब यांनी सर्व मतदार, पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून अध्यक्षपदासाठी प्रेमलता पारवे यांच्यासह 26 प्रभागांत 52 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी काल मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रवादीच्या विकासधारेत दाखविलेला विश्वास हे पक्षासाठी समाधान मानण्यासारखे असल्याचे शेख तय्यब यांनी स्पष्ट केले.
आपल्या पत्रकात बोलताना त्यांनी म्हटले – बीड नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत लक्षवेधी व चुरशीची ठरली. सर्वच पक्षांनी आपल्या ताकदीनुसार प्रचार केला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादा पवार यांच्या विकासमंत्राचा आधार घेत निवडणुकीला सामोरे गेलो. शहरवासीयांनी हा विकास मुद्दा सकारात्मकतेने स्वीकारला, त्यामुळे आमच्या उमेदवारांना जोरदार प्रतिसाद मिळाला.
शेख तय्यब यांनी पुढे स्पष्ट केले की, राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवानेते, ज्येष्ठ नेत्यांनी रात्रंदिवस परिश्रम करत पक्षाची विचारधारा घराघरांत पोहोचवली. विशेषतः शहरातील सर्वसामान्य मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून लोकशाही अधिक बळकट केली. शेवटी त्यांनी सर्व मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असेही म्हटले की, जनतेचा मतदानरूपी आशीर्वाद हेच आमचे खरे बळ आहे. बीडच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असून अजितदादांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भक्कम कामगिरीनंतर, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असेच एकदिलाने काम करत राहतील असा विश्वास मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष शेख तय्यब यांनी व्यक्त केला.









