बीड (रिपोर्टर): अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेणार्या बीड नगरपालिका निवडणुकांसाठी काल मतदान झाले. तसे कोण निवडून येणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली. आपआपल्या पक्षांचे कार्यकर्ते घडीच चालली, तुतारी वाजली, कमळ फुललं म्हणून दावे करत आहेत. कुठं पतंगामुळे अडचण आली तर कुठे वंचितने तारलं असं म्हणत गणितं जोडले जात आहेत. उरल्यासुरल्या काँग्रेस बाबत कुठेतरी भाष्य एकेवयास येत आहे. आता तब्बल 17 दिवस निकालाचे हे रवंथ केले जाणार.
राजकीयदृष्ट्या बीड जिल्हा प्रचंड संवेदनशील आहे. इथे बीडच्या राजकारणावर सोडा बशीरगंज सह शहरातले असे काही चौक आहेत, तिथे गल्ली ते दिल्ली नव्हे अमेरिका, चीन, जपान, पाकिस्तान, अफगाणिस्तान यासह अन्य देशातल्या राजकारणाची चर्चा होते. राजकीयदृष्ट्या अत्यंत सजग असलेल्या बीड शहरात काल नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान झाले. अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पाटी, एमआयएम, वंचित, काँग्रेससारख्या पक्षांनी याठिकाणी अध्यक्षपदासाठी उमेदवार दिले. दोन राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये खरी लढत पहायला मिळाली. खरंतर आज निकाल होता परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे हा निकाल थेट 21 डिसेंबरवर गेला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह पुढारी, पदाधिकारी यांचा हिरमोड झाला. पण कार्यकर्ते, पुढार्यांकडून आणि समर्थकांकडून आपणच कसे निवडून येऊ याचे दावे – प्रतिदावे आता केले जात आहेत.
कुठल्या भागात कोणाला किती मतदान पडले ? कुठल्या जातीने कुणाला मतदान केले? घडी कशी चालली? कमळ कसं फुललं? तुतारी कशी वाजली? पतंगाने कोणाची दोर कापली? वंचितने कोणाला तारलं? यावर चर्चा होत असून क्रॉस वोटींग कशी झाली, किती झाली? कुणामुळे झाली? यावरही भाष्य केले जात आहे. त्यामुळे आता प्रत्येक जण आपलाच उमेदवार निवडून येणार हा दावा करत असला तरी विजयी उत्तर 21 तारखेला मिळेल.









