बीड (रिपोर्टर): हैदराबाद गॅझेटिअरनुसार नोंदी आढळतील, त्या मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मोठे आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकारने जीआर काढत मनोज जरांगेंची मागणी मान्य केली. आता मागणी मान्य झाल्यावर गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यातील केवळ 98 जणांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहे. आठ जिल्ह्यातून केवळ 594 अर्ज आले आहेत. पण, त्यातील केवळ 98 जणांना अर्ज प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
संभाजीनगरमध्ये 14 अर्ज प्राप्त झाले असून कोणताही अर्ज मान्य झाला नाही, तर परभणी)त 445 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी 47 अर्ज मान्य ठरले. जालनामध्ये 78 अर्ज प्राप्त झाले असून आठ अर्ज मान्य ठरले, हिंगोलीमध्ये पाच अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी तीन अर्ज मान्य झाले. नांदेडमध्ये पाच अर्ज प्राप्त झाले आणि सर्व पाच अर्ज मान्य ठरले, तर बीडमध्ये 12 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी नऊ अर्ज मान्य झाले. लातूर)मध्येही 12 अर्ज प्राप्त झाले असून नऊ अर्ज मान्य ठरले, तर धाराशिवमध्ये तेरा अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी चार अर्ज मान्य ठरले आहे. आता यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले, प्रमाणपत्र देताना सरकारने दिरंगाई करू नये. वेळेत प्रमाणपत्र द्यावेत, मराठा समाजानेही प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत. अधिकारी दिरंगाई करत आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी ज्यांचे अर्ज आले आहेत त्यांचे प्रमाणपत्र देण्याबाबत सांगावे, असेही पाटील यांनी म्हटले.









