मुंबई (रिपोर्टर): गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील 29 महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र, आता या ठिकाणी निवडणुका होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. प्रलंबित 29 मनपाच्या निवडणुका आता एकाच टप्पात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सोमवारनंतर कधीही याची घोषणा होऊ शकते, असंही सांगण्यात येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत आयोग यासंदर्भातील घोषणा करण्याची शक्यता आहे. 15 तारखेनंतर कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते, असं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे 12 जानेवारीनंतर मतदान आणि दुसर्या दिवशी निकाल जाहीर होऊ शकतो, अशी माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.
दुसरीकडेकाही महापालिका अशा आहेत, जिथे 50 टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. यात नागपूर आणि चंद्रपूर या मनपांचा समावेश आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुका होतील की नाही, अशी शंका होती. मात्र, आता ठिकाणी देखील निवडणुका होतील, अशी सुत्रांची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुकीचा निकाल न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे याठिकाणी देखील निवडणूक होणार आहे.
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासनिक पातळीवरही हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणूक अधिकारी आणि सहायक अधिकार्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. काही अधिकार्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. राज्यात 15 डिसेंबरनंतर कधीही महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. भाजप, काँग्रेस आणि ठाकरेंकडून महापालिकेतील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात येत आहेत.








