बीड रिपोर्टर
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि बीड जिल्ह्यातील आमदार धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात सामाजिक आंदोलने करणार्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्याचा मुद्दा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत विधानसभेत मांडला. यावेळी मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते अॅड. मंगेश ससाणे, लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान मुंडे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिले.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
विधानसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले की, काल रात्री आमच्या बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यात, माजलगाव ते धारूर या प्रवासादरम्यान प्रसिद्ध वकील आणि ओबीसी समाजाचे नेते व आरक्षणाचे अभ्यासक अॅड मंगेश ससाणे यांच्या वाहनावर मध्यरात्री हल्ला घडवून आणला. याआधी लक्ष्मण हाके यांचा सहकारी असलेला पवन करवर याच्यावर माजलगाव तालुक्यात एका हॉटेलमध्ये जीवघेणा हल्ला झाला. अनेकांनी झुंड करून त्याचे हातपाय तोडले, आजही तो व्यवस्थित चालू शकत नाही. या प्रकरणात दुर्दैवाने एकही आरोपी पकडला गेलेला नाही.
लक्ष्मण हाके यांच्यावरती दोन-तीन वेळा हल्ले, यापुढे जाऊन वाघमारे यांच्यावर हल्ला. म्हणजे कोणी एखादा सामाजिक आंदोलन करणारा नेता किंवा कार्यकर्ता या महाराष्ट्रात सामान्यरित्या फिरू शकतो की नाही? एवढी वाईट अवस्था झाली आहे. महाराष्ट्रातील सामाजिक समता पूर्ण संपली आहे असे मी म्हणेन. एकमेकाला मारून, मारल्यानंतर सोशल स्टेटस ठेवलं जातं. त्याला सोशल मीडियावर योद्धा असं पुकारलं जातं. अटक होत नाही हे दुर्दैव आहे. सारखा गुन्हा असेल तर, एका भावाला शिक्षा झाली तर दुसर्या भावाला शिक्षा झाली पाहिजे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान सभागृहात धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कडक कारवाई केली जाईल असे उत्तर दिले.









