मुंबई/दिल्ली : आमदार धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जागी धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. यामुळेच मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी दिल्ली दौऱ्यात अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती आहे. ते जवळपास एक तास संसद भवनात उपस्थित होते. सकाळी ११ वाजता संसद भवनात दाखल झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळात पुन्हा एकदा ‘वापसी’ होणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील सध्या दिल्लीत असल्याने धनंजय मुंडे यांचा हा दिल्ली दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी काळात याबाबत पक्षाकडून काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









