बीड, (रिपोर्टर)ः- जिल्हा परिषदेच्या हातपंप विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्यांना वेळेवर पेन्शन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची आणि कर्जबाजारी होण्याचीवेळ आली आहे. एका पेन्शनरला उपचार करण्यासाठी वेळेवर पैसे नसल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जि.प.च्या सीईओ यांनी याची दखल घेवून पेन्शनर कर्मचार्यांना वेळेवर पेन्शन देण्याची मागणी केली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या हातपंप विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्यांना वेळेवर पेन्शन दिली जात नाही. नागोराव साहेबराव गालफाडे (वय 75) हे डायलेसिसवर होते. त्यांच्या उपचारासाठी त्यांना पैसे नव्हते. जि.प.ने त्यांची पेन्शन वेळेवर खात्यावर जमा केली नसल्याने उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान पाणी पुरवठा विभागातील शेलार नामक कर्मचारी पेन्शनरची पिळवणूक करत आहे. त्यांच्या या अरेरावी पणामुळे पेन्शनर त्रस्त झाले आहेत. वित्त विभागाने तीन महिन्याच्या पेन्शनसाठी 70 लाख रूपयांचा निधी अदा केला आहे तरीही पेन्शनरला पैसे मिळाले नाहीत. पेन्शनरचे हाल थांबविण्यात यावे आणि त्यांनावेळेवर पेन्शन द्यावी अशी मागणी जि.प.च्या सीईओकडे गालफाडे शहाबाई नागोराव, प्रकाश नागोराव गालफाडे, श्रीकांत गालफाडे आणि मनिषा गालफाडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.








