मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेत्या, माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, माजी मंत्री व माजी खासदार डॉ. शालिनीताई पाटील यांचे शनिवारी दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी माहीम, मुंबई येथील ‘ज्योती सदन’ या निवासस्थानी निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात निर्भीड विचारांची, ठाम भूमिकेची आणि सामाजिक न्यायासाठी झगडणारी एक प्रभावी आवाज कायमचा शांत झाला आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राज्यभरातील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
सत्यशोधक परंपरेतून घडलेले नेतृत्व
डॉ. शालिनीताई पाटील या सत्यशोधक विचारांचे प्रणेते ज्योतिजीराव फाळके पाटील यांच्या कन्या होत. सामाजिक समता, विचारस्वातंत्र्य आणि अन्यायाविरोधातील लढा हा वारसा त्यांनी घरातूनच आत्मसात केला होता. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत वकिलीची पदवी मिळवली. अभ्यासू, स्पष्टवक्त्या आणि निर्भीड मतप्रदर्शन करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
राजकीय कारकीर्दीची दमदार सुरुवात
सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. पुढे त्या आमदार व खासदार म्हणून निवडून आल्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जात. काँग्रेस पक्षात असताना त्यांनी संसदीय कामकाजात ठसा उमटवला. राज्याच्या महसूल मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळाची विशेष दखल घेतली जाते. प्रशासनावर पकड, निर्णयक्षमता आणि कठोर भूमिका यामुळे त्यांचा दरारा होता.
सांगली ते सातारा : संघर्षमय राजकीय प्रवास
१९८५ साली त्यांनी सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याकडे आपला राजकीय प्रवास वळवला. काही काळ त्या सातारारोड पाडळी स्टेशन येथील मूळगावी वास्तव्यास होत्या. चिमणगावच्या माळावर श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी हा त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा ठरला. या कारखान्यासाठी परवाना मिळवताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सहकार क्षेत्रातही त्यांनी आपली ठाम छाप उमटवली.
राजकीय विजय, पराभव आणि धाडसी निर्णय
१९९९ मध्ये त्यांनी विधानसभेचे माजी सभापती व काँग्रेसचे दिग्गज नेते शंकरराव जगताप यांचा पराभव करून त्यांच्या २५ वर्षांच्या संसदीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला. हा विजय राज्याच्या राजकारणात मोठा धक्का मानला गेला. त्यानंतर त्यांनी कोरेगाव तालुक्यात स्वतःचा स्वतंत्र कारखाना गट उभा केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर त्यांनी शरद पवार यांच्याशी जुळवून घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला. २००४ मध्ये पुन्हा एकदा विधानसभेवर त्यांची निवड झाली.
आर्थिक निकषावर आरक्षण : वादळी पण ठाम भूमिका
आर्थिक निकषावर आरक्षण या मुद्द्यावर डॉ. शालिनीताई पाटील यांनी नेहमीच ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली. पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्या भूमिकेशी मतभेद असूनही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेससाठी अडचणीची ठरली आणि त्यातून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.
यानंतर त्यांनी ‘क्रांतिसेना’ या स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना केली. आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करताना त्यांनी विद्यमान मागासवर्गीय आरक्षण धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या भूमिकेमुळे त्या वादग्रस्त ठरल्या, मात्र विचारांशी तडजोड न करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख अधिक ठळक झाली.
निर्भीड विचारांची अखेरची सलामी
डॉ. शालिनीताई पाटील यांचे संपूर्ण सार्वजनिक जीवन हे संघर्ष, वैचारिक स्पष्टता आणि धाडसी निर्णयांनी भरलेले होते. सत्तेपेक्षा विचारांना महत्त्व देणाऱ्या, मतभेद असूनही ठाम उभ्या राहणाऱ्या नेत्या म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने एक निर्भीड, अभ्यासू आणि लढाऊ नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.









