वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यातील मोरवड येथील शेतकरी भैय्यासाहेब शेळके यांच्या शेतात बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शेळके यांचे शेत बटईने कसणारे बटईदार महादेव गायकवाड यांच्या परसडी नावाच्या शेतात ही घटना घडली. काल सकाळी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास शेतातील कोठ्यात बांधलेल्या एका शेळी व तिच्या पिल्लावर बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात शेळी व पिल्लू ठार झाले.
सदरील या घटनेने मोरवडसह परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेळीवरील हल्ल्यानंतर बिबट्या मोर्चा वघारीच्या दिशेने वळत असतानाच शेतकरी शेतात दाखल झाला. मोटारसायकलचा आवाज होताच बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली. मात्र परिसरात बिबट्याचा वाढलेला वावर आणि झालेल्या हल्ल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भीती, दहशत व चिंतेचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल शिवाजी कांबळे, वन कर्मचारी एस.डी.पारवे यांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी भेट दिली. मृत शेळी व पिल्लाचे पशुवैद्यकीय अधिकार्यांकडून शवविच्छेदन (पी.एम.) करण्यात आले. तपासणीत बिबट्यानेच हल्ला केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी व वनविभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे. सध्या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी विशेष दक्षता घेण्याची मागणी केली असून, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच पिंजरा लावण्याची कार्यवाही तात्काळ करावी, अशी मागणी मोरवड येथील शेतकरी भैय्यासाहेब शेळके यांनी केली आहे. या घटनेमुळे मोरवड व परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.











