बीड : रिपोर्टर
नुकत्याच संपन्न झालेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात लातूर–कल्याण (जनकल्याण द्रुतगती महामार्ग) उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा महामार्ग लातूर–अंबाजोगाई–केज–जामखेड–अहिल्यानगर मार्गे कल्याणपर्यंत राबविण्याचे नियोजन असून, तो बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, हा महामार्ग बीड जिल्ह्याऐवजी धाराशिव जिल्ह्यातून वळवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र भाऊ फडणवीस यांना पत्राद्वारे विनंती करत, हा महामार्ग अन्यत्र वळवू नये व मूळ नियोजनाप्रमाणे बीड जिल्ह्यातूनच राबवावा, अशी ठाम मागणी केली आहे.
या महामार्गामुळे परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर जोडले जाणार असून, धार्मिक पर्यटनासह औद्योगिक प्रगती, दळणवळण सुलभता आणि शेतीमाल वाहतुकीस मोठी चालना मिळणार आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कमी वेळेत व कमी खर्चात मुंबई, कल्याण, पुणे यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आपला शेतीमाल पोहोचवणे शक्य होणार आहे. तसेच वाहतूक सेवा व संलग्न क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची संधी या प्रकल्पातून उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, हा महामार्ग बीड जिल्ह्याऐवजी धाराशिव जिल्ह्यातून वळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समोर येत असून, बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असलेला हा प्रकल्प अन्यत्र वळवणे हे दुर्दैवी व अन्यायकारक ठरेल, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
बीड जिल्हा आधीच दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, स्थलांतर आणि मर्यादित औद्योगिक वसाहती अशा अनेक गंभीर समस्यांना तोंड देत आहे. अशा परिस्थितीत या महामार्गाच्या निमित्ताने चालून आलेली विकासाची संधी हिरावून घेतल्यास जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, युवक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
त्यामुळे जनभावना व नैसर्गिक न्यायाच्या भूमिकेतून राज्य शासनाने प्रस्तावित लातूर–कल्याण (जनकल्याण द्रुतगती महामार्ग) हा प्रकल्प मूळ नियोजनाप्रमाणे बीड जिल्ह्यातूनच राबवावा, अशी नम्र पण ठाम मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.









