मुंबई (रिपोर्टर): मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला पहिला अधिकृत मित्रपक्ष मिळाला असून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत या युतीची माहिती दिली. यावेळी काँग्रेसकडून सचिन सावंत, तर वंचितकडून धैर्यवर्धन फुंडकर, सिद्धार्थ मोकळे यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजपविरोधात एकत्र लढण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला.
संख्येचा खेळ नाही, विचारांचा मेळ
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचं नातं हे केवळ निवडणुकीपुरतं नसून वैचारिक अधिष्ठानावर आधारित असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं. संविधान मानणं, करुणा, समता आणि बंधुता या मूल्यांवर दोन्ही पक्ष ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं.
1999 नंतर तब्बल 25 वर्षांनी ही युती होत आहे. मतभिन्नता असू शकते, पण मनभिन्नता नाही. हा संख्येचा खेळ नाही, तर विचारांचा मेळ आहे, असं सपकाळ म्हणाले. काँग्रेसच्या स्थापना दिनीच युतीची घोषणा होणंही अर्थपूर्ण असल्याचं त्यांनी नमूद केलं.
वंचित 62 जागांवर लढणार
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन फुंडकर यांनी युतीबाबत अधिकृत घोषणा केली. 2014 मध्येच असा योग जुळून आला असता तर भाजप देशाच्या सत्तेत इतका बळकट झाला नसता. आज भाजपला रोखण्यासाठी ही युती झाली आहे, असं ते म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 62 जागांवर वंचित बहुजन आघाडी युतीतून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भातील सीट शेअरिंगचा करार पूर्ण झाल्याची माहितीही देण्यात आली.
काँग्रेसच्या जागांबाबत अद्याप स्पष्टता नाही
वंचित बहुजन आघाडीच्या जागांची संख्या जाहीर झाली असली, तरी काँग्रेस नेमक्या किती जागांवर लढणार याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही. काँग्रेस इतर समविचारी पक्षांसोबतही चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या चर्चांनंतर काँग्रेसच्या जागांची अंतिम संख्या जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या राजकारणात या युतीमुळे नवी समीकरणे तयार होण्याची चिन्हे असून भाजपविरोधात विरोधकांची ताकद वाढणार असल्याचं मानलं जात आहे.









