पुणे | रिपोर्टर
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय घडामोडी घडल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची युती होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भर जाहीर सभेत याबाबत अधिकृत घोषणा केली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असून शरद पवार गट तुतारी तर अजित पवार गट घड्याळ या चिन्हांवर निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये युतीबाबत सातत्याने बैठका सुरू होत्या. चर्चा फिस्कटल्याचीही चर्चा होती, मात्र अखेर युतीवर शिक्कामोर्तब झालं आहे.पुणे शहरातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याची दाट शक्यता असून याबाबत आज रात्री अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे.
पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडताना आयोजित जाहीर सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी,
“चिंचवडमध्ये राष्ट्रवादी म्हणजे घड्याळ आणि तुतारी एकत्र लढत आहेत. हा परिवार पुन्हा एकत्र येत आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. जागावाटप पुढे-मागे करून करण्यात आलं आहे. येणाऱ्या दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल,” असं सांगितलं.
भाजपवर जोरदार टीका
भाषणादरम्यान अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.
“माझ्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. आज मात्र दमबाजी, दबाव आणि धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. हे नेमकं काय चाललं आहे?” असा सवाल त्यांनी केला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप करत ते म्हणाले,
“एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेली पिंपरी-चिंचवड आज कर्जबाजारी झाली आहे, हे दुर्दैवी आहे.”
अजित पवारांचे ठळक मुद्दे
“1992 ते 2017 या काळात महानगरपालिका चालवताना कधीही कर्ज काढावं लागलं नाही. माझ्यावर पाच पैशांचाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही.”
“2017 नंतर 2022 मध्ये निवडणूक व्हायला हवी होती, मात्र कोरोना व इतर कारणांमुळे त्या पुढे ढकलल्या गेल्या.”
“पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांचा दरारा राहिलेला नाही. दबाव, धमक्या आणि बांधकामं थांबवण्याचे प्रकार सुरू आहेत.”
“मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. कुणाच्याही दबावाला घाबरू नका.”
“आम्ही कधीही जातीवाद केला नाही. आपलं रक्त लाल आहे.”
“अलीकडील निवडणुकांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच काम करू शकते, हे जनतेला माहीत आहे.”
महापालिका निवडणुकांआधी राष्ट्रवादीतील ही युती राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवणारी ठरणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.









