बीड (रिपोर्टर): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जाचक व अव्यवहार्य अटींमुळे मराठा समाजातील उद्योजक व लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर अडवणूक होत असून महामंडळ जाणीवपूर्वक मराठा समाजाला टार्गेट करत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रवि शिंदे यांनी केला आहे.
मराठा समाजामध्ये शेतकरी प्रवर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अर्ज करणार्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यास ट्रॅक्टर देण्यात यावा, अशी पहिली मागणी शिंदे यांनी केली. तसेच 7/12 आणि 8-अ या कागदपत्रांची अट शिथिल करावी, कारण मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःच्या नावावर 7/12 असणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2018 ते 2024 या कालावधीतील अनेक अर्जदारांच्या प्रोफाईलमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता अझझङध ऋजठ छएथ ङजख असा पर्याय दाखवण्यात येत असल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना बँकेचे मंजुरीपत्र महामंडळाच्या पोर्टलवर अपलोड करता येत नाही. परिणामी अनेक लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत. हे सर्व अर्ज तात्काळ पूर्ववत करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली.
महामंडळाचा नवीन अर्ज भरताना उत्पन्न प्रमाणपत्राची मर्यादा किती आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती पोर्टलवर उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ जर केवळ बँकेकडून घेतलेल्या व्यावसायिक कर्जावरील व्याज परतावा देत असेल, तर उत्पन्न प्रमाणपत्राची अट सक्तीची कशासाठी, असा सवालही उपस्थित करण्यात आला. बँका कर्ज मंजूर करताना तहसीलचे उत्पन्न प्रमाणपत्र न पाहता लाभार्थ्याच्या व्यावसायिक इन्कमटॅक्सच्या आधारे कर्ज प्रक्रिया करतात, याची नोंद महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी घ्यावी, असेही रवि शिंदे यांनी नमूद केले.
दरम्यान, महामंडळाने काल दिलेल्या उत्तरामध्ये जुन्या पात्रता प्रमाणपत्रानुसार बँक कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना 15 जानेवारी 2026 पर्यंत बँक मंजुरीपत्र अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये आजही -झझङध ऋजठ छएथ ङजख हाच पर्याय दिसत असून महामंडळाने दिलेली माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला. महामंडळाचे आंदोलन दडपण्यासाठीच ही माहिती देण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
या सर्व बाबींवर तात्काळ निर्णय घेऊन अडचणी दूर करण्यात याव्यात, अन्यथा 15 दिवसांनंतर बीडमध्ये तीव्र मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनावेळी रामहरी मेटे, सचिन उबाले, राजेंद्र आमटे, लाभार्थी विजय गायके, सचिन पवार, अशोक सुरवासे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक लाभार्थी उपस्थित होते.









