बीड :
बीड जिल्ह्यातील पालवन शिवारात उभारलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्प परिसरात मागील पंधरा दिवसांत दोन वेळा आग लागण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या आगीमागे जाणीवपूर्वक घातपात असल्याचा गंभीर आरोप करत अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी ते लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सयाजी शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, बीड जिल्ह्यात आधीच झाडांची संख्या कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्या सात वर्षांपासून सह्याद्री देवराई प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. मात्र ही वाढलेली वनराई काही समाजकंटकांना खुपत असून, जाणीवपूर्वक झाडांना आग लावली जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
पहिल्यांदा आग लावण्यात आली तेव्हा सुमारे १०० ते १५० झाडे जळून खाक झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आग लावण्यात आली असून, यावेळी सात वर्षांपूर्वी लावलेली झाडे जाळण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, सकाळी ११ वाजता दिवसाढवळ्या तीन ठिकाणी एकाच वेळी आग लावण्यात आल्याने हा प्रकार अपघाती नसून नियोजित असल्याचे स्पष्ट होत आहे.
“झाडं जाळणाऱ्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला,” असे सांगत शिंदे यांनी या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या या ठिकाणी आमची माणसे तसेच वनविभागाचे अधिकारी काम करत असून, अशा घटना थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शुक्रवारी पुन्हा आग लागल्यानंतर वनविभागासह सयाजी शिंदे यांच्या बीडमधील शिष्टमंडळाने देवराई प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली. तसेच या प्रकल्प परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे.
सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून आणि वनविभागाच्या सहकार्याने उभारलेल्या या प्रकल्पाला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली होती. या आगीने क्षणात रौद्ररूप धारण करत झाडे, औषधी वनस्पती यांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. तसेच अनेक पक्षी होरपळून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली.
ओसाड डोंगराला हिरवागार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या या प्रकल्पावर वारंवार होणाऱ्या आगीमुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. डोळ्यादेखत झाडांची नासधूस झाल्याने सयाजी शिंदे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना, “बीडमधील ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.









