दोन महिन्यापासून शाळा झाडाखाली भरते
रस्ता उपलब्धकरून द्या म्हणत चिमुकल्याचे जि.प.समोर आंदोलन
बीड, (रिपोर्टर)ः- माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील दत्त नगरवस्तीच्या शाळेकडे जाणार्या रस्त्यावर अतिक्रमण करून सदरील हा रस्ता बंद करण्यात आल्याने मुलांना झाडाखाली बसूनच ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी वेळोवेळी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. मात्र जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज या लहान लहान चिमुकल्यांनी जि.प. कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं या सह इतर घोषणांनी जि.प.चा परिसर दणाणून गेला होता.
माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदार संघातील टाकरवण केंद्रीय जिल्हा परिषद शाळा अंतर्गत दत्त नगरवस्ती शाळाआहे. या ठिकाणी सुसज्ज इमारत असून शाळेकडे जाणार्या रस्त्यावर अतिक्रमण करत शाळेचा रस्ता बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना एका लिंबाच्या झाडाखाली बसून उघड्यावर ज्ञानाचे धडे गिरवावे लागत आहेत. शाळेचा रस्ता मोकळा करून द्या अशी मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आज मुलांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं,शाळेसाठी रस्ता उपलब्ध करून द्या यासह इतर घोषणांनी जि.प.चा परिसर दणाणला होता. या मुलांसोबत त्यांचे पालक ही उपस्थित होते. सदरील हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली झाले असून या वेळी शेख युनूस, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार,शेख मोबीन,रामधन जमाले, राजकुमार कदम, डीजी तांदळे, नितीन जायभाय, डॉ.तांदळे, बाजीराव ढाकणे, ज्ञानेश्वर कोरडे,राजेंद्र भिसे, शहाजी भुंबे, अडागळे, कौसर, कुरेशी, शालिंदा गरड, भारत भुंदळ, संतोष अडागळे, वचिष्ट आटवे यांच्या सह आदींची उपस्थिती होती.









