डोंगरेवाडीच्या मयत ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना 20 लाखाची भरपाई निधी दिला
दोन जखमींना प्रत्येकी 50 हजाराची मदत
वडवणी (रिपोर्टर): धाराशिव जिल्ह्यातील भाऊसाहेब बिराजदार कारखान्याच्या परिसरात डोंगरेवाडीच्या गणेश डोंगरे या तरुणाचा दुर्दैवी अपघात होऊन जागीच मृत्यू झाला होता. या कुटुंबाला आर्थिक भरपाई मिळावी म्हणून काल स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड कामगार व मालवाहतूक संघटनेच्या वतीने कारखान्यावर जाऊन थेट गव्हाणी मध्ये उतरून कारखाना बंद करत जन आंदोलन पुकारले होते. हे आंदोलन तब्बल 15 तास डोह फोडल्या नंतर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास कारखाना प्रशासनाला माणुसकीचा पाझर फुटला आणि मयत गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना 20 लाखाची तर जखमी दोघांना प्रत्येकी 50 हजाराची भरपाई म्हणून देण्यात आली.
सदरील घटनेला सहा दिवसानंतर अखेर मयताच्या कुटुंबीयांना भरपाई निधी कारखान्याकडून मिळाला आहे. निधी मिळवण्यासाठी स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड कामगार व मालवाहतूक संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कृष्णा तिडके, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय आंधळे यांनी या आंदोलनाला लीड केले. तर या आंदोलनात ज्येष्ठ नेते प्रा. सोमनाथ बडे, माऊली शिरसाट, माजी नगरसेवक सतीश बडे,भाजपाचे वडवणी शहराध्यक्ष श्रीमंत मुंडे, कोठारबनचे उपसरपंच भास्कर मुंडे, मानवी हक्क अभियानाचे वडवणी तालुकाध्यक्ष विष्णू मुजमुले, बाबा मुंडे यांच्यासह स्थानिक जय भवानी ऊसतोड कामगार संघटनेन पाठिंबा दर्शविला तसेच स्थानिकचे मानवी हक्क अभियानाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. हे आंदोलन काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरू झाले होते. तर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या आंदोलनाचा समारोप झाला. या कालावधीमध्ये आंदोलन मोडीत काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले होते. परंतु कोणत्याही मुजोरीला न जुमानता आंदोलनकर्त्यांनी ऐकी दाखवत हे आंदोलन यशस्वी करत पार पाडले. हे आंदोलन तब्बल 15 तास चालल्याने या दरम्यान घोषणा देखील देण्यात आल्या होत्या. या परिश्रमानंतर भाऊसाहेब बिराजदार कारखान्याला अखेर माणुसकीचा पाझर फुटला आणि मयत ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांच्या पत्नीच्या नावे 21 लाखाचा आर्थिक भरपाईचा धनादेश मयताची पत्नी अश्विनी डोंगरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यामध्ये जखमी बाबा नागरगोजे व भरत डोंगरे या दोघानना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. मयत गणेश डोंगरे यांच्याकडे कारखान्याची संपूर्ण उचल देखील माफ करण्यात आली आहे. तर भरपाईचा धनादेश देताना कारखान्याचे प्रशासन उपस्थित होते.तर ही आर्थिक भरपाई नुकसान दिल्याप्रकरणी आंदोलनकर्त्यांनी देखील समाधान व्यक्त करत कारखान्याचे आभार मानले आहेत.
रिपोर्टरचे देखील आभार
सदरील आंदोलन सुरू असताना सर्वात पहिले साजं दैनिक बीड रिपोर्टरने वृत्तांकन करत मुख्य बातमी करून प्रसिद्धी दिली. या बातमीने सदरील आंदोलन संपूर्ण धाराशिव व बीड जिल्ह्यात वार्यासारखे पसरले. या आंदोलनात काय होते. याकडे देखील बीड जिल्ह्याचे लक्ष लागून होते. तर मध्यरात्री आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाची प्रसिद्धी देऊन साजं.दै. बीड रिपोर्टर लेखणीच्या माध्यमातून कर्तव्य निभवले आहे. या बातमीचा वाचकांसह नातेवाईकांनी देखील कुटुंबाच्या मागे असेच उभे राहावे अशा प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत.









