पंकजा म्हणाल्या, गडाच्या सर्वांगीन विकासाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना
धनंजय मुंडेंनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
भल्या सकाळी धनंजय मुंडेंच्या हस्ते महापुजा
श्रीक्षेत्र गहिनीनाथगड (रिपोर्टर): इथं मला मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर गहिनीनाथगडाचा सेवक, वामनभाऊंचा भक्त म्हणून निमंत्रण दिलं आहे. मी वामनभाऊंचा आशिर्वाद घेण्यासाठी गडावर आलो आहे आणि मी सातत्याने वामनभाऊंचा आशिर्वाद घेण्यासाठी गडावर येत राहील, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गहिनीनाथगडाच्या विकासाची सर्व जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. गडाचा विकास असाच अविरत सुरू राहणार आहे. आता गहिनीनाथगड ते पंढरपूर हा पालखी रस्ता लवकरच होईल, असे आश्वासन देत वामनभाऊंना वाचा सिद्धी होती. ते जे बोलत होते ते होत होतं. त्यांनी समाजातील सर्व वर्गाला भक्ती मार्गाला लावले, असे प्रतिपादन या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी केले.
ते संत वामनभाऊ यांच्या 50 व्या पुण्यतिथीनिमित्त गहिनीनाथगडावर आले होते. या वेळी गडाचे मुख्य मठाधिपती ह.भ.प. विठ्ठल महाराज, राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आ. धनंजय मुंडे, आ. सुरेश धस, मा. मंत्री जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संत वामनभाऊ महाराजांनी समाजाला अध्यात्माचा लळा लावला. समाजात एकोपा आणला. मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होतं, हा संदेश दिला. अगदी चोरांनाही उपदेश दिला. त्यामुळे चोर चोरी सोडून वारकरी झाले. वामनभाऊंचा अध्यात्मिक, सामाजिक, सर्वक्षेत्रातला परिवर्तन विकासाचा आवाका मोठा होता. वामनभाऊंना वाचा सिद्धी होती. ते जे बोलत होते ते होत होते. समाजातल्या शेवटच्या व्यक्तींना वामनभाऊंनी कीर्तनातून, विचारातून उपदेश दिला. संतांमध्ये आणि भक्तांमध्ये कुठलाही भेद नसतो म्हणून इथं जे हे कठाडे मोठे केले आहेत ते कमी करण्याचे महाराजांना सांगितले. समोरचा हा मंडप पाहून समाधान वाटल्याचेह फडणविसांनी या वेळी म्हटले. आपण आता पंढरपूरला जागा घेतली आहे, प्रामुख्याने गडाच्या कामाच्या सर्व जबाबदार्या मी आणि व्यासपीठावरील सर्वांनी घेतल्या आहेत. विठ्ठल महाराजांनी गहिनीनाथगड ते पंढरपूर या पालखी रस्त्याबाबत मला सांगितले आहे, तो रस्ताही आपण लवकर करू. मला इथं मुख्यमंत्री म्हणून आमंत्रण दिलं नाही, तर गडाचा भक्त, गडाचा सेवेकरी म्हणून मी इथे आलो आहे. गडाचा अनुयायी म्हणून मी गडावर येत राहील, असेही शेवटी देवेंद्र फडणविस म्हणाले. तर या वेळी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी अवघ्या चार मिनिटांचे भाषण केले. त्या म्हणाल्या, गहिनीनाथगडाच्या सर्वांगीन विकासाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते.
धनंजय मुंडेंच्या हस्ते महापुजा
श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर आज भल्यासकाळी संत वामनभाऊ सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याच्या अनुषंगाने माजी मंत्री तथा आ. धनंजय मुंडे, महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या हस्ते महापुजा करण्यात आली. पुण्यतिथी निमित्त आयोजीत कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी सूत्रसंचालन केले. गहिनीनाथगडाच्या सर्वांगीन विकासासाठी व त्याच्या पाठपुराव्यासाठी धनंजय मुंडे मुंडे सातत्याने प्रयत्नशील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या हस्ते या ठिकाणी महापुजा होते.









