बीड : बीड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी रात्रगस्तीदरम्यान पोलिसांनी कारवाई करत धारदार घातक कोयत्यासह एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक संदीप नेवरे हे पोलीस अंमलदार इलियास शेख, अफसर बागवान व चालक फिरोज पठाण यांच्यासह रात्रगस्त करत असताना माळी वेस चौक येथे एक पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ (एम.एच. १७ बीई ५००७) संशयास्पदरीत्या उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाहनातील इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव संजय पांडुरंग बहिर (वय २७, रा. नवघन राजुरी, ता. जि. बीड) असे सांगितले. मात्र तो त्या ठिकाणी का थांबला आहे, याबाबत समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांना संशय आला.
यानंतर पोलीस उपनिरीक्षक नेवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहनाची झडती घेतली असता, गाडीच्या मधल्या सीटखाली लोखंडी पातीचा धारदार व घातक कोयता आढळून आला. पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपीस ताब्यात घेऊन बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
आरोपीकडून एक लोखंडी धातूचा धारदार कोयता व पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. पुढील चौकशीत संजय बहिर याच्यावर यापूर्वी बीड ग्रामीण पोलीस स्टेशन, पिंपळनेर पोलीस स्टेशन व शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे खून, खुनाचा प्रयत्न, रात्री घरफोडी, चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक पूजा पवार व पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप नेवरे, पोलीस अंमलदार इलियास शेख, अफसर बागवान व चालक फिरोज पठाण यांनी सहभाग घेतला असून पुढील तपास पोलीस हवालदार बबन जाधव करीत आहेत.
शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून रात्रगस्त व तपासणी मोहिम अधिक तीव्र करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.









