बीड / धारूर :
एम.डी. (मेडिसिन) अभ्यासक्रमात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली तरुण वैद्यकीय अधिकाऱ्याची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील मुख्य आरोपीला बीड पोलिसांनी कराड (जि. सातारा) येथून अटक केली आहे. या आरोपीवर देशातील विविध राज्यांमध्ये एकूण 15 गुन्हे दाखल असून तब्बल 3 कोटी 86 लाख 61 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे सांगण्यात येते

धारूर पोलीस ठाण्यात दिनांक 09 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी अविनाश रामचंद्र तोंडे (वय 27, व्यवसाय – वैद्यकीय अधिकारी, रा. सोनीमोहा, ता. धारूर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 453/2025, कलम 318(4) बी.एन.एस.एस.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक केज, श्री. वेंकटराम (भा.पो.से.) हे स्वतः करत आहेत.
फिर्यादी अविनाश तोंडे हे बारामती (जि. पुणे) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना एस. के. एज्युकेशन संस्थेच्या फेसबुक अकाउंटवरून नागपूर येथील सौरभ सुहास कुलकर्णी याच्याशी ओळख झाली. एम.डी. मेडिसिनसाठी मॅनेजमेंट कोट्यात प्रवेश हवा असल्याने फिर्यादी आरोपीच्या संपर्कात होते. आरोपीने जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, वर्धा येथे प्रवेश मिळवून देतो असे सांगत तीन वर्षांची फी 99 लाख रुपये असल्याचे सांगून ती 65 लाखांत करून देतो, असे आमिष दाखवले.
दिनांक 20 सप्टेंबर 2024 ते 29 सप्टेंबर 2024 या कालावधीत आरोपीने फिर्यादीकडून नगद तसेच फोनपे व बँक खात्याद्वारे एकूण 8 लाख रुपये उकळले. मात्र कोणत्याही प्रवेश यादीत फिर्यादीचे नाव न आल्याने आणि प्रवेश न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. पैसे परत मागितल्यावर आरोपीने “तुला काय करायचे ते कर” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर फिर्यादीने धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान आरोपी सौरभ कुलकर्णी याच्यावर नाशिक, सोलापूर, जालना, नागपूर, पुणे, मुंबई, सांगली, गुजरात, पंजाब आदी ठिकाणी अशाच प्रकारचे फसवणुकीचे एकूण 15 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि टेक्निकल अॅनालिसिस सेल बीड यांच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढत पोलिस पथकाने आज दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी कराड येथून त्याला शिताफीने अटक केली.
सध्या आरोपीकडून आणखी कुठे-कुठे फसवणूक केली आहे याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड श्री. नवनीत कवट साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक केज श्री. वेंकटराम (भा.पो.से.), पोलीस उपनिरीक्षक जावेद कराडकर, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमिर इनामदार, तसेच पोना/1035 मंदे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.









