बीड (रिपोर्टर): बीड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून चौथ्यांदा नगरसेवक झालेले विनोद मुळुक यांनी उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापाठोपाठ भारतीय जनता पार्टीच्या सारिका योगेश क्षीरसागर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आणि नगरपालिकेत त्रिशंकू स्थिती असल्याने कोण उपनगराध्यक्ष होणार? याबाबत उत्कंठता एकीकडे वाढत चालली मात्र दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास सारिका क्षीरसागर यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला. त्यामुळे बीड नगरपालिकेवर आता एकहाती अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापीत झाली आणि उपनगराध्यक्षपदी विनोद मुळुक हे बिनविरोध निवडले गेले. तर पाच स्विकृत सदस्यांचीही निवड करण्यात आली.
नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. उपनगराध्यक्षपदासाठी कुठल्याही पक्षाकडे बहुमत नाही. त्यामुळे उपनगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आज उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले विनोद मुळुक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपाकडून गटनेत्या डॉ. सारिका योगेश क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे नगराध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते मात्र दुपारी पावणे दोनच्या सुमारास डॉ. सारिका क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज परत घेतला. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विनोद मुळुक हे उपनगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडले गेले. त्याचबरोबर स्विकृत सदस्यांची निवडही आज केली गेली. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून मोईन मास्टर, दिनेश मुंदडा, भाजपाकडून गोविंद शिराळे, रवि कदम तर आ. संदीप क्षीरसागरांकडून खान मसूद उमर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये उत्साहाचे वातावरण असून
फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.









