मुंबई | ऑनलाईन रिपोर्टर
महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे मतदान पूर्ण झाले असून, सर्वांचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागले आहे. सकाळी ७.३० वाजता मुंबईत मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, काही ठिकाणी गोंधळ, तसेच मतदारांच्या बोटावरील शाई सॅनिटायझरने पुसली जात असल्याच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
मतदानानंतर आता विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर येऊ लागले असून, त्यातून मुंबईत सत्ता परिवर्तनाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप महायुतीला बहुमताच्या जवळ किंवा बहुमतापेक्षा अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
DV रिसर्चच्या सर्व्हेनुसार, मुंबईत भाजप आणि शिंदेसेना यांच्या महायुतीला १०७ ते १२२ जागा मिळू शकतात. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला ६८ ते ८७ जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेस-वंचित आघाडीला १८ ते २५ जागा, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला २ ते ४ जागा मिळण्याची शक्यता असून, अपक्ष, समाजवादी पक्ष आणि एमआयएमसह इतरांच्या खात्यात ८ ते १५ जागा जाण्याचा अंदाज आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा असून, बहुमतासाठी ११४ जागांची आवश्यकता आहे.
सकाळी जाहीर झालेल्या दुसऱ्या एक्झिट पोलनुसारही महायुतीच्या बाजूनेच जनमत झुकल्याचे दिसून येते. या पोलनुसार महायुतीला सुमारे १२२ जागा मिळू शकतात. यात भाजपाला ८४, शिंदेसेनेला ३५, उद्धव ठाकरे गटाला ६५ आणि मनसेला १० जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस-वंचित आघाडीला २० तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला ३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Axis My India च्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ४० टक्के पुरुष आणि ४४ टक्के महिलांची पसंती मिळाल्याचा अंदाज आहे. तर उद्धव ठाकरे-राज ठाकरे युतीला ३३ टक्के पुरुष आणि ३१ टक्के महिलांनी मतदान केल्याचे चित्र आहे. काँग्रेसला सुमारे १३ टक्के पुरुष व महिला मते मिळाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, JVC एक्झिट पोलनुसार महायुतीला तब्बल १३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई उत्तर विभागातील ४२ जागांपैकी भाजपाला २७ ते २८, शिंदेसेनेला ७ ते ८ जागा मिळतील, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४ ते ५ जागांवर समाधान मानेल असा अंदाज आहे. काँग्रेसला २ ते ३ जागा मिळण्याची शक्यता असून, मनसे आणि इतर पक्षांना या विभागात खातेही उघडता येणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एकूणच विविध एक्झिट पोलनुसार मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन होण्याची दाट शक्यता असून, ठाकरे बंधूंना मोठा राजकीय धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत. अंतिम चित्र मात्र निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.









