बीड (रिपोर्टर)ः- बीडच्या एका शासकीय विभागात कार्यरत असलेल्या कर्मचार्याचा पालीजवळ गाडीत मृतदेह आढळून आला. सदरील कर्मचार्याने आत्महत्या केली की त्याचा घातपात करण्यात आला हे स्पष्ट झाले नव्हते. घटनास्थळी ग्रामीण पोलीसांनी धाव घेवून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला होता. सदरील हा कर्मचारी रात्रीपासून बेपत्ता होता. त्या बाबतची तक्रार देखील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रात्री नोंदवण्यात आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सचिन नारायण जाधवर वय-45 वर्षे हे बीडच्या एका शासकीय विभागामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते. रात्री पासून ते बेपत्ता होते. बेपत्ता झाल्याने त्यांच्या घरच्यांनी शिवाजी नगर पोलीसात तक्रार नोंदवली होती. आज दूुपारी एक वाजण्याच्या दरम्यान पाली जवळ एका गाडीमध्ये मृतदेह असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतला. या कर्मचार्याने आत्महत्या केली की त्याचा घातपात करण्यात आला हे मात्र स्पष्ट झाले नव्हते. शवविच्छेदनानंतर मरणाचे कारण समोर येईल. या प्रकरणाचा अधिक तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहे.









