परळी | ऑनलाईन रिपोर्टर
मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेले मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी परळी तालुक्यातील मिरवट येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताह सोहळ्याला भेट दिली. यावेळी त्यांनी अध्यात्मिक वातावरणात उपस्थित राहून समाजाला एकजुटीचे आवाहन केले, तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना राज्यातील राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडत भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केली.
माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, “भाजपवाले फार मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांचाही काटा काढला आहे,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला. अजित पवार यांच्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “अजितदादांनी नासके आणि पापी लोक सोबत ठेवले, त्यामुळे मराठा समाज त्यांच्यापासून दुरावला. पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना मिळालेले अपयश हे मराठा मतदारांच्या नाराजीचेच द्योतक आहे.”
निवडणुकांपासून अलिप्त राहण्याचा पुनरुच्चार
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाज दुरावल्याचा थेट फटका या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना बसला आहे. मात्र, स्वतः निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याबाबत त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली. “मी विधानसभा, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकांमध्ये नव्हतो, आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही मी अलिप्तच राहणार आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
एकजुटीचा मंत्र आणि कुणबी प्रमाणपत्रांचा मुद्दा
यावेळी जरांगे पाटील यांनी ‘मराठा–दलित–मुस्लिम’ या सामाजिक समीकरणाचा पुनरुच्चार करत, “हे तीन समाज एकत्र आले की सगळ्यांचा धुरळा उडतो,” असे मत व्यक्त केले. परळी तालुक्यातील कुणबी प्रमाणपत्रांबाबत सुरू असलेल्या तक्रारींचा मुद्दा लवकरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून सोडवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ह.भ.प. विष्णू महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाला उपस्थित राहून जरांगे पाटील यांनी अध्यात्मिक ऊर्जा घेतली आणि समाजाने एकजुटीने, शांततेच्या मार्गाने आपले हक्क मिळवावेत, असे आवाहन केले.








