बीड (रिपोर्टर): नवीन वर्षात जिल्हा ग्रामीण यंत्रणेने घरकुल लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी स्पर्श प्रणाली नावाचे नवीन अॅप आणले. या अॅपद्वारे 48 तासात पैसे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होतील, असे सांगण्यात आले, मात्र गेल्या 25 दिवसांपासून एकाही लाभार्थ्याच्या खात्यावर या अॅपमधून पैसे पडले नसल्यामुळे घरकुलधारक अडचणीत सापडले. त्याचबरोबर तालुका पातळीवरील प्रशासकीय अधिकार्यांना याचा ताळमेळ लागत नसल्याने सध्यातरी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे अॅप कधी कार्यान्वित होणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.
बीड जिल्ह्यात शेकडो लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ मिळालेला आहे. काहींचे घरकुल पूर्ण झालेले आहेत. ज्यांचे घरकुल पूर्ण झाले त्यांचे हप्ते बाकी आहे. नवीन वर्षात नवीन अॅपद्वारे घरकुलधारकांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. 2026 साली जिल्हा ग्रामीण यंत्रणेने स्पर्श प्रणालीद्वारे लाभार्थ्यांचे पैसे खात्यावर टाकले पण 25 दिवस झाले, अद्यापही पैसे खात्यावर पडले नाहीत. विशेष म्हणजे 48 तासात खात्यावर पैसे पडतील, असे सांगण्यात आले होते मात्र एक महिना होत आला तरीही पैसे खात्यावर पडलेले नाहीत. या अॅपमध्ये काहीतरी बिघाड असावा, त्यामुळेच पैसे पडेना गेले. पैशासंदर्भात लाभार्थी दररोज पंचायत समिती कार्यालयात चकरा मारू मारू बेजार आहेत. तर अधिकार्यांनाही या अॅपबाबत काही कळत नसल्याचे दिसून येऊ लागले. हे अॅप वरूनच असल्यामुळे त्यांना याबाबत काही सांगता येत नाही. येत्या दोन-चार दिवसात तरी या अॅपद्वारे पैसे पडणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. ज्यांनी उसनवारीने घराचे बांधकाम केले ते लाभार्थी मात्र चांगलेच अडचणीत सापडले आहेत.








