बीड :
धुळे–सोलापूर महामार्गावर कारमध्ये मृतावस्थेत आढळलेले जीएसटी अधिकारी सचिन जाधव यांचा मृत्यू आत्महत्येचा नसून घातपाताचा असल्याचा ठाम दावा त्यांच्या पत्नी मयुरी जाधव यांनी केला आहे. “माझे पती आत्महत्या करूच शकत नाहीत. या प्रकरणाचा योग्य व सखोल तपास करून दोषी आरोपीला तात्काळ अटक करावी,” अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन केली.
सचिन जाधव यांचा मृतदेह बीडजवळील धुळे–सोलापूर महामार्गावर त्यांच्या कारमध्ये आढळून आला होता. विशेष म्हणजे त्या कारमध्ये मडके, कोळसा, लाकूड तसेच कोयताही सापडल्याने या मृत्यूबाबत संशय अधिक गडद झाला आहे. बंद कारमध्ये मडक्यात कोळसा व लाकूड जाळून धूर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
मयुरी जाधव यांनी मोठा आरोप करत सांगितले की, “माझ्या पतीला गेल्या आठ दिवसांपासून मानसिक त्रास दिला जात होता. त्यांच्या कारमध्ये सुसाईड नोट सापडल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र ती आम्हाला अद्याप दाखवण्यात आलेली नाही. ती सुसाईड नोट आम्हाला दाखवावी तसेच ज्यामुळे हा प्रकार घडला त्या दोषी अधिकाऱ्याचे नाव समोर आणून
त्याला कठोर शिक्षा द्यावी.”
या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत आपली फिर्याद नोंदवून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
काय घडला होता प्रकार?
सचिन जाधव हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील चुंब गावचे रहिवासी होते. २०१२ च्या एमपीएससी परीक्षेत त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. मागील काही वर्षांपासून ते बीड येथील जीएसटी कार्यालयात सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत होते.
शुक्रवारी ते घरातून बाहेर पडले होते, मात्र शनिवारीपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पत्नी मयुरी जाधव यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता, बीडजवळील कपिलधारवाडी परिसरात त्यांचा मृतदेह कारमध्ये संशयास्पद स्थितीत आढळून आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास सुरू केला. शवविच्छेदनादरम्यान मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळल्याचे सांगण्यात येत असून, त्यात वरिष्ठांकडून होणाऱ्या त्रासाचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी एका अधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई सुरू असल्याचे बीड पोलिसांनी सांगितले आहे.
सर्वांशी मनमिळावू स्वभावाचे असलेले सचिन जाधव यांच्या मृत्यूभोवती अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित झाली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी जोरदार मागणी नातेवाईक व नागरिकांकडून होत आहे.









