मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.यानुसार 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी घेतली जाणार आहे. मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
राज्य निवडणूक आयोगाने 13 जानेवारी 2026 रोजी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. नामनिर्देशन, माघार, चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादीची प्रक्रिया पूर्ण झाली असून मतदान व मतमोजणीचे टप्पे शिल्लक होते.
अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी अपघाती निधनानंतर 28 ते 30 जानेवारीदरम्यान राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला होता. या कालावधीत सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने निवडणूक प्रक्रियेत बदल करणे आवश्यक ठरले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीनंतर केवळ दोन आठवड्यांची मुदतवाढ दिल्याने निवडणूक प्रक्रिया ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करणे बंधनकारक होते.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. जाहीर प्रचाराची मुदत 5 फेब्रुवारी रात्री 10 वाजता संपेल. मतमोजणीनंतर आचारसंहिता तात्काळ हटवण्यात येईल.
निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असून, निवडणूक प्रक्रिया फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे.









