बीड (रिपोर्टर): बहुचर्चीत वाळू टेंडर घोटाळ्यावर अलर्ट मोडवर असलेल्या जिचल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी टेंडर चालकांसह टिप्पर मालकांवर प्रत्येकी एक कोटीच्या आसपास दंड आकारल्याची विश्वसनीय माहिती हाती येत असून टेंडर चालक आणि टिप्पर मालक हे कायद्याच्या कचाट्यात तंतोतंत अडकले जावेत यासाठी अभ्यासपूर्ण दंडाची कारवाई केली जात असल्याचे प्रशासकीय सुत्रांचे सांगणे आहे. एक कोटीच्या आसपास प्रत्येकी दंड पहाता टेंडरचालक आणि टिप्पर मालकांची संख्या ही शंभरच्या आसपास असल्याने हा दंड शंभर कोटीच्या पुढे जाणार हे आता ठळकपणे दिसून येत आहे. यामुळे टेंडर आणि टिप्पर चालकात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात घुरकुलासह अन्य बांधकामांना वाळू ही अवैधरित्या जादा भावात खरेदी करावी लागणार असल्याने सर्वसामान्य पुन्हा एकदा मेटाकुटीला आल्याचे दिसून येते.
बीड जिल्ह्यात वाळू तस्करी नवी नाही. महसूल विभागाच्या भ्रष्ट आणि लाचखोर कारभारामुळे सर्रासपणे वाळूची तस्करी होते. महसूलबरोबर पोलीस, आरटीओ हे दोन विभागही वाळू तस्करीला लाचेच्या स्वरूपातून खुली सूट देतात हेही अनेकदा उघड झाले आहे. परिणामी याचे विपरीत परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसतात. माफियांकडून जादा दराने वाळू घ्यावी लागते. ही सततची ओरड शासन दरबारी पहायला मिळते. मध्यंतरी बर्याच कालखंडानंतर बीड जिल्ह्यात वाळूचे टेंडर काढण्यात आले. गोदावरीसह जिल्ह्यातल्या अन्य मोठ्या नद्यांमधून वाळू उपसा अधिकृतपणे करण्याबाबत परवानगी देण्यात आली. मात्र टेंडर चालक आणि टिप्पर मालक यांनी इथेही महसूल विभागाच्या काही लाचखोर अधिकार्यांच्या संगनमतातून शक्कल लढवत शासनाला महसूल भरलेल्या एका पावतीवर तब्बल तीन ट्रीप चालू ठेवल्या. हे गौडबंगाल सर्रासपणे हमाम मे सब नंगे होत सुरू होते. मात्र लाचेच्या रकमेवरून अथवा महसूल विभाग आणि टिप्पर चालकांच्या देवान-घेवाणीवरून हा विषय चर्चेत आला. याची तक्रार देण्यात आली आणि या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पडताळी केली तेव्हा एका पावतीवर तीन ट्रीप होत असल्याचे स्पष्ट झाले. सदरची गंभीर बाब लक्षात घेता जिल्हाधिकार्यांनी टेंडर चालकांसह टिप्पर मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे धोरण आखले. पाचपट दंड आकारायचा की, तीनपट दंड आकारायचा ? यावर प्रशासन दरबारी खलबते सुरू आहेत. प्रक्रिया ही कायदेशीर व्हावी, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. कारवाई ही न्यायदरबारी टिकावी या दृष्टीकोनातूनही या प्रकाराकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार टेंडर चालक आणि मालकांवर प्रत्येकी एक कोटीच्या आसपास दंड आकारण्याची दाट शक्यता आहे. ही दंडाची रक्कम शंभर कोटींवर जाण्याची शक्यता वर्तवली जात असून आज संध्याकाळपर्यंत अथवा उद्या सकाळपर्यंत ही कारवाई पूर्णत्वास नेली जाणार असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. त्यामुळे टेंडर चालक आणि टिप्पर मालकात खळबळ उडाली आहे.









