परळी (रिपोर्टर) परळी ही माझी जन्म आणि कर्मभूमी असून इथल्या प्रत्येक कुटुंबाचा मी सदस्य आहे. कोविड काळात आमच्यातील संवाद काही प्रमाणात निर्बंधांमुळे दुरावला होता, त्यामुळेच आता ’राष्ट्रवादी आपल्या दारी’ या अभियानाच्या माध्यमातून परळी शहरातील घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणी देखील केली जात असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ’राष्ट्रवादी आपल्या दारी’ हे अभियान हाती घेण्यात आले असून, याअंतर्गत स्वतः धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी याना घेऊन प्रत्येक वॉर्डातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. याअंतर्गत आज सकाळी वॉर्ड क्रमांक एक मधील मिलिंद नगर भागातील घरोघरी धनंजय मुंडे पोचले व त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनीही या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद देत धनंजय मुंडे यांचे मोठ्या आपुलकीने स्वागत केले. कुणी हार घालून तर महिलांनी ओवाळून मुंडेंचे स्वागत केले. धनंजय मुंडे यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच सोबतीला असलेल्या प्रशासकीय अधिकार्यांच्या मार्फत सदर अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान हे अभियान दर रविवारी सकाळी याच पद्धतीने सुरू राहणार असून अधिकाधिक नागरिकांची पक्षाचे सक्रिय सदस्य म्हणून नोंदणी केली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.